Published On : Sun, Aug 29th, 2021

रस्त्यांवरून होणारी वाहतूक कमी व्हावी : ना. नितीन गडकरी

मालवाहतूक ही जलमार्गाने व रेल्वेने व्हावी मराठी विज्ञान परिषदेचा वार्षिक कार्यक्रम

नागपूर: रस्त्यांमुळे प्रदेश समृध्द, संपन्न होतो, ही बाब खरी असली तरी आज 70 टक्के मालवाहतूक व 90 टक्के प्रवासी वाहतूक रस्त्यांच्या माध्यमातून होते. ही वाहतूक कमी झाली तर इंधन खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होईल. जलमार्ग, रेल्वे मार्ग, रस्ते व नंतर विमान वाहतुकीचा उपयोग व्हावा, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

मराठी विज्ञान परिषदेच्या वार्षिक कार्यक्रमात ‘रस्ते निर्मितीमध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्त्व’ या विषयावर ना. गडकरी बोलत होते. व्हिडिओ कॉन्सफरिंगच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमाला पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, प्रा. ज्येष्ठराज जोशी, प्रभाकर देवधर, डॉ. पी. एस. रामाणी, डॉ. विजय भटकर, शशिकांत तांबे, डॉ. अनिल मोहरीर उपस्थित होते.

या कार्यक्रमात बोलतान ना. गडकरी म्हणाले- पेट्रोल व डिझेलचा वापर कमी झाला पाहिजे. कारण आज 8 ते 10 लाख कोटींच्या इंधनाची आयात आपल्याला करावी लागते. यामुळे अर्थव्यवस्थेवर बराच ताण पडतो. येत्या काळात ग्रीन हायड्रोजनचा उपयोग करावा यासाठी आमचे प्रयत्न आहे. तसेच लिथियम ऑयन बॅटरी वापरण्याचाही प्रयत्न आहे. दर्जा उत्तम ठेवून रस्ते बांधकामाचा खर्च कसा कमी करता येईल, यासाठी रस्ते बांधकामात टायर, प्लास्टिक, रबर, याचा वापर करण्याची सुरुवात आम्ही केली आहे. तसेच सिमेंट आणि स्टीलला पर्याय म्हणून फ्लाय अ‍ॅशचा वापर आणि प्रिकास्ट तंत्रज्ञानाचा वापर करून रस्त्यांच्या बांधकामात होणारा खर्च कमी करणे शक्य आहे.

महामार्ग मंत्रालयातर्फे शासनाने आणलेल्या ‘स्क्रॅपिंग पॉलिसीत’ पुनर्प्रक्रिया करून भंगार साहित्याचा वापर रस्ते बांधकामात व्हावा अशी तरतूद करण्यात आली आहे. कचर्‍यापासून संपत्ती निर्माण करण्याच्या पध्दतीवर विज्ञानाच्या लोकांनी लक्ष घातले तर बांधकामाचा कमी होईल, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- राजस्थानात आता 17 रस्ते आम्ही असे बांधत आहोत की, या रस्त्यावर वाहतूकही करता येईल आणि विमानही उतरेल. वाहतुकीच्या क्षेत्रात कमी खर्चात अनेक गोष्टी करता येईल यासाठी भरपूर संधी आहेत. यावेळी ब्रॉडगेज मेट्रोचे उदाहरणही त्यांनी दिले.

रस्त्यावरून होणार्‍या वाहतुकीला पर्याय म्हणून ब्रॉडगेज मेट्रोसारखी वाहतूक आणली तर पेट्रोल-डिझेल या इंधनाच्या खर्चात बचत होईल व लोकांना ती परवडणारी असेल. देशात 1 लाख 40 हजार किमीचे महामार्ग असून ते आता 2 लाख किमीपर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. 40 टक्के वाहतूक ही महामार्गांवरून व्हावी, अशी अपेक्षा असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- ‘ग्रीन एक्स्प्रेस हायवे’ची संकल्पना राबविताना झाडे लावा, झाडे जगवा ही संकल्पना महामार्गाच्या दोन्ही बाजूंना झाडे लावून यशस्वी करण्यात आली. आता झाडे तोडली जाणार नाही तर त्यांचे यशस्वी स्थानांतरण केले जाणार आहे. आतापर्यंत एनएचएआयने 12 हजार झाडे स्थानांतरित केली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

महामार्ग मंत्रालय आता रस्ते, पूल आणि बोगदे यावर शैक्षणिक आणि संशोधन संस्थांच्या माध्यमातून संशोधन प्रकल्प राबवीत असल्याचे सांगून ते म्हणाले- संशोधनासाठी मंत्रालयाने आयआयटी रुरकी, मद्रास आणि वाराणसी या तीन संस्थांशी सामंजस्य करारही केले आहेत. तसेच या संस्थांच्या माध्यमातून 8 संशोधन प्रकल्प हाती घेतले आहे. ध्वनी, पाणी आणि वायू प्रदूषण कसे कमी करता येईल, यावर संशोधन करून शाश्वत तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.