Published On : Fri, May 13th, 2022

नदी स्वच्छता अभियानाचे कार्य प्रगतीपथावर

Advertisement

नागपूर : पावसाळ्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण होउ नये, नागरिकांना त्रास सहन करावा लागू नये या उद्देशाने पावसाळ्यापूर्वी शहरातून वाहणाऱ्या नद्यांची स्वच्छता करण्यात येते. नागपूर महानगरपालिकेच्या वतीने मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार १२ एप्रिलपासून नदी व नाले स्वच्छता अभियानाला सुरूवात करण्यात आली. शहरातून वाहणा-या नाग, पिली आणि पोहरा नदीचे स्वच्छता कार्य सुरू असून ते प्रगतीपथावर आहे.

नाग नदी १७.४ किमी, पिली नदी १६.४ आणि पोहरा नदी १३.१२ किमी असे तिनही नद्यांचे एकूण ४६.९२ किमी पात्र स्वच्छ करायचे आहेत. या अंतर्गत आतापर्यंत १३.६७ किमी क्षेत्र स्वच्छ झालेले आहे. स्वच्छ झालेल्या भागातून १७११६.८७ क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आलेला आहे. नदी स्वच्छतेसाठी १२ पोकलेन कार्यरत आहेत.

नाग नदी अंतर्गत अंबाझरी तलाव ते पंचशील चौक, पंचशील चौक ते अशोक चौक, अशोक चौक ते सेंट झेव्हियर स्कूल, सेंट झेव्हियर स्कूल ते पारडी पूल, पारडी पूल ते नदीचे संगम पर्यंत नाग नदीची स्वच्छता सुरू आहे. पिली नदीचे गोरेवाडा ते मानकापूर घाट, मानकापूर घाट ते कामठी रोड पूल, कामठी रोड पूल ते जुने कामठी रोड पूल, जुने कामठी रोड पूल ते नदीचे संगम अशा टप्प्यात स्वच्छता कार्य केले जात आहे. पोहरा नदीची शंकर नगर ते नरेंद्र नगर, नरेंद्र नगर ते पिपळा फाटा, पिपळा फाटा ते नरसाळा विहिरगाव अशा भागातून स्वच्छता केली जात आहे. तिनही नद्यांच्या पात्रांची योग्यरित्या स्वच्छता होउन नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांचेमार्फत कार्याचा वेळावेळी आढावा घेतला जात आहे. नदी स्वच्छतेचे कार्य प्रगतीपथावर असून ते लवकरच पूर्णत्वास जाईल.

नदी व नाले स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून दरवर्षी ०.८ – १.५ लक्ष मेट्रिक टन गाळ काढण्यात येते. यावर्षी नदी स्वच्छता अभियान अंतर्गत नद्यांची रूंदी व खोली पूर्णपणे स्वच्छ करून पावसाळी पाणी वाहण्याकरीता सुरळीत प्रवाह करण्यात येणार आहे. याद्वारे वाहणाऱ्या पाण्याची क्षमता वाढेल आणि नदी काठावर असलेल्या वस्त्यांत पावसाळ्यात येणाऱ्या पूरापासून सुरक्षा प्रदान होईल. नदी स्वच्छता अभियान प्रत्येक वर्षी लोक सहभागातून राबविण्यात येते.