Published On : Tue, Jun 15th, 2021

इतवारी स्थानक मालधक्क्यावरील कामामुळे पाणी साचण्याचा धोका

Advertisement

– महापौरांनी रेल्वे-मनपा अधिकाऱ्यांसोबत केला संयुक्त पाहणी दौरा

नागपूर : इतवारी रेल्वे स्थानकाच्या विस्तारीकरणाचे कार्य सुरू असल्यामुळे कामादरम्यान निघणाऱ्या मातीमुळे पावसाळी नाल्या आणि अन्य प्रवाह बंद झाले आहेत. यामुळे पावसाळ्यात पाणी साचण्याचा धोका होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेत सोमवारी (ता. १४) महापौर दयाशंकर तिवारी यांनी रेल्वेचे अधिकारी आणि मनपाच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त दौरा करून संबंधित समस्या तातडीने दूर करण्याचे निर्देश दिले.

महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासोबत आरोग्य सभापती संजय महाजन, नगरसेवक नरेंद्र बोरकर, आरोग्य विभागाचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, सहायक आयुक्त विजय हुमणे, साधना पाटील आणि रेल्वेचे अधिकारी राम यादव, ए. के. त्रिपाठी, अधिक यादव उपस्थित होते. सर्वप्रथम महापौरांनी इतवारी रेल्वे स्थानकाच्या मालधक्क्याचे निरिक्षण केले. तेथे सुरू असलेल्या कामामुळे सुमारे १५ फूट उंच मातीचा ढिगारा तयार झाला आहे.

तेथेच पावसाळी नाला असल्याने नाल्याची साफसफाई करण्याकरिता तेथून मशीन उतरविणे अशक्य आहे. तेथेच रेल्वे ट्रॅकखालून जाणारा नालाही चोक झाल्याने पावसात पाणी वाहून जाणे अशक्य आहे. त्याचप्रकारे जैन समाजद्वारा निर्मित अहिंसा वाटिकाच्या आतून जो पावसाळी नाला प्रवाहित होतो तो सुद्धा पुढे जाऊन बंद झाला आहे. त्या ठिकाणी खोदकाम करून बॉक्स टाईप नाल्याचे काम करणे अत्यावश्यक आहे.

परंतु हा सारा परिसर साऊथ ईस्ट रेल्वेअंतर्गत असल्याने महानगरपालिका त्या परिसरात कार्य करू शकत नाही. त्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांच्या समन्वयाने हे कार्य व्हावे यासाठी ह्या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर परिसर लकडगंज आणि सतरंजीपुरा झोनअंतर्गत येत असल्याने दोन्ही झोनचे सहायक आयुक्तही उपस्थित होते. साऊथ इस्टर्न रेल्वेच्या आय.ओ.डब्ल्यू. यांच्यासोबत चर्चा करून लवकरात लवकर रेल्वे ट्रॅकच्या खालील नाल्याचे रुंदीकरण आणि बॉक्स टाईप नाल्याचे निर्माण कार्य करण्याचे निर्देश यावेळी दिले.