Published On : Thu, Mar 22nd, 2018

पत्रकारांवर दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्याः डॉ. राजू वाघमारे

Dr Raju Waghmare
मुंबई: परभणी जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेचा पेपर फुटल्याची बातमी छापल्या प्रकरणी लोकमत व पुण्यनगरी या दोन वृत्तपत्रांच्या प्रतिनिधी विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पेपर फुटीचे प्रकार रोखण्याऐवजी वृत्तपत्रांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रकार म्हणजे माध्यमांची गळचेपी आहे काँग्रेस पक्ष याचा तीव्र निषेध करित असून वृत्तपत्रं आणि पत्रकारांवर दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी केली आहे.

या संदर्भात बोलताना डॉ. वाघमारे म्हणाले की, शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे राज्याच्या विविध भागातून रोज पेपर फुटीचे प्रकार समोर येत आहेत. परभणीतही पेपर फुटीचा प्रकार समोर आल्यावर या प्रकरणी पेपर फोडणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याऐवजी बातमी छापणाऱ्या वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींवर गुन्हा दाखल करून प्रसार माध्यमांवर दबाव टाकण्याचा व त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाने केला आहे़.

पेपर फोडणारी टोळीत कोण कोण सहभागी आहे? त्यामागे कोणते शिक्षक, कर्मचारी आहेत? याबाबतची माहिती घेऊन त्याचा तपास करून पोलिसात गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते. पण शिक्षणाधिका-यांनी पेपरफुटीची बातमी देणा-या वृत्तपत्रांच्या प्रनिधींविरोधात तक्रार केली व पोलिसांनी कुठलाही तपास न करता गुन्हे दाखल केले आहेत. परभणीत दुस-या एका पेपर फुटीच्या प्रकरणात पोलीसच आरोपी आहेत. शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या सहभागाशिवाय पेपर फुटूच शकत नाही, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषी अधिका-यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी डॉ. वाघमारे यांनी केली आहे.