Published On : Mon, Oct 26th, 2026
By Nagpur Today Nagpur News

दिवाळीच्या जल्लोषावर नियमांचे बंधन; फटाके कुठे आणि किती वाजेपर्यंत फोडता येणार? नियम मोडल्यास कारवाई

Advertisement

दिवाळीच्या जल्लोषावर नियमांचे बंधन; फटाके कुठे आणि किती वाजेपर्यंत फोडता येणार? नियम मोडल्यास कारवाई

मुंबई : दिवाळी म्हटली की रोषणाई, फराळ आणि फटाक्यांचा जल्लोष; मात्र यंदा फटाके फोडताना नियमांकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. ध्वनी आणि वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार फटाक्यांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सार्वजनिक रस्ते, पदपथ आणि संवेदनशील ठिकाणांच्या परिसरात फटाके फोडण्यावर मर्यादा असून, नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे दिवाळी साजरी करताना नागरिकांना आनंदासोबतच नियमांचीही काळजी घ्यावी लागणार आहे.

रात्री १० नंतर फटाके फोडता येणार नाहीत-
फटाक्यांच्या आवाजामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना त्रास होऊ शकतो. याशिवाय ध्वनीप्रदूषण आणि हवेच्या गुणवत्तेवरही परिणाम होतो. हे लक्षात घेऊन रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत आवाज करणारे फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. रस्ते, पदपथ, गल्लीबोळ आणि रस्त्यापासून १० मीटरच्या परिसरात फटाके फोडण्यावरही निर्बंध असल्याचे वृत्त आहे.

रुग्णालये, शैक्षणिक संस्था, सरकारी कार्यालये आणि न्यायालयांपासून १०० मीटरच्या परिसरात फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे फटाके खरेदी करण्यापूर्वीच ते कुठे आणि कोणत्या वेळेत फोडता येतील, याची माहिती घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हरित फटाके वापरण्याचे आवाहन; तरीही आवाजाची मर्यादा महत्त्वाची-
प्रदूषण कमी करण्यासाठी नागरिकांनी मान्यताप्राप्त हरित फटाक्यांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, हरित फटाके असले तरी त्यांच्याबाबत लागू असलेल्या ध्वनीमर्यादा आणि इतर नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

Advertisement

फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, आवाज फाउंडेशनने हरित फटाक्यांमध्येही विषारी जड धातू आढळत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे फटाक्यांचा वापर आणि त्यातून होणारे प्रदूषण याबाबत पर्यावरणप्रेमींकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

फटाके विक्रीसाठीही नियम; परवान्याशिवाय व्यवसाय करता येणार नाही-
दिवाळीच्या काळात तात्पुरते फटाके विक्री स्टॉल सुरू करण्यासाठी ६ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२६ या कालावधीसाठी परवाने दिले जाणार असल्याची माहिती आहे. परवान्याची मुदत संपल्यानंतर विक्री करता येणार नाही. उरलेला फटाक्यांचा साठा अधिकृत गोदामात किंवा घाऊक परवानाधारकाकडे जमा करावा लागेल.

तात्पुरत्या फटाके विक्री स्टॉलच्या ५० मीटरच्या परिसरात आतषबाजी करण्यास मनाई असेल. तसेच विदेशी बनावटीच्या फटाक्यांची विक्री करण्यासही निर्बंध आहेत. फटाके विक्रेत्यांनी परवान्याच्या अटींचे पालन करणे आवश्यक आहे.

नियम मोडल्यास कायदेशीर कारवाई-
फटाक्यांच्या आवाजाची मर्यादा, विक्रीचे नियम आणि सुरक्षिततेच्या अटींचे उल्लंघन झाल्यास संबंधित कायद्यांनुसार कारवाई होऊ शकते. चार मीटर अंतरावर १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांवर निर्बंध आहेत. तसेच १०० पेक्षा अधिक फटाके असलेल्या साखळी बॉम्बवर बंदी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने फटाक्यांवरील निर्बंधांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याबद्दल प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे. मुंबई महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलिस प्रशासनाला न्यायालयात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आल्याचीही माहिती आहे.

यंदाच्या दिवाळीत फटाक्यांचा आवाज करण्यापेक्षा सुरक्षित आणि जबाबदारीने सण साजरा करण्यावर भर द्यावा लागणार आहे. मात्र, निर्बंधांची अंमलबजावणी नेमकी कशी होते आणि नियम मोडणाऱ्यांवर कोणती कारवाई केली जाते, याकडेही लक्ष राहणार आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.