-भारतीय सत्धम्म बुद्धविहारात अस्थीची पुनर्स्थापना
नागपूर– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महास्थवीर चंद्रमणी यांच्या अस्थी एकाच विहारात असण्याचा हा दुर्मिळ प्रसंग आहे. जगाच्या पाठीवर कुठेच दोघांच्या अस्थी एकाच ठिकाणी नाहीत. वर्षावासाच्या प्रारंभी अस्थिकलाशाची पुनर्स्थापना हा एक ऐतिहासिक क्षण आहे, असे प्रतिपादन दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष व धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महास्थवीर चंद्रमणी यांच्या अस्थीची भारतीय सत्धम्म बुद्धविहार येथे चांदीच्या कलशात पुनर्स्थापना करण्यात आली. या प्रसंगी ससाई बोलत होते. शनिवार २४ जुलै रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमाला भिक्षू संघ आणि उपासक-उपासिका उपस्थित होत्या. तत्पूर्वी सकाळी भंते नागवंश यांच्या हस्ते सुत्तपठन आणि परित्राण पाठ घेण्यात आले. विहार समितीचे अध्यक्ष डी. एम. बेलेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यावेळी ससाई यांनी अस्थीचा इतिहास आणि सत्धम्म विहाराची ऐतिहासिक माहिती दिली. अस्थी पुनर्स्थापना करण्याचे स्वप्न आज पूर्ण झाल्याचे ते म्हणाले.
या विहाराचे बांधकाम सुरू असताना येथील अस्थी भदंत ससाई यांच्या निवासस्थानी सुरक्षित ठेवण्यात आल्या. विहाराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अस्थिकलश पुनर्स्थापित करण्यासाठी विधिवत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शनिवारी दुपारी भव्य भिक्षू संघासह अस्थीचे आगमन विहारात झाले. यावेळी अस्थीवर पुष्पवर्षाव करण्यात आला. त्रिशरण पंचशील घेतल्यानंतर ससाई यांच्या हस्ते अस्थिकलशाची पुनस्र्थापना करण्यात आली. समूहघोष सामाजिक संस्थेतर्फे चांदीचे दोन कलश (दीड किलोचे) दान स्वरूपात देण्यात आले. याच चांदीच्या कलशात बाबासाहेब आणि महास्थवीर चंद्रमणी यांच्या अस्थी ठेवण्यात आल्या. यावेळी एस.के. गजभिये यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला विहार समितीचे अध्यक्ष डी. एम. बेलेकर, सचिव राजकुमार मेश्राम, निरंजन वारकर, धरमदास मेश्राम, जगेश मेश्राम, रवि मंडाले, कल्पना द्रोणकर, रेखा वानखेडे, भंते नागसेन, भंते नागानंद, भंते धम्मबोधी, भंते आनंद, भंते धम्मदीप, संघप्रिया उपस्थित होत्या. संचालन भंते नागवंश, राजकुमार मेश्राम यांनी तर आभारप्रदर्शन वर्षा धारगावे यांनी केले.
