Published On : Thu, Jun 24th, 2021

विकास कामांची कालमर्यादा पाळून जनतेला तात्काळ प्रतिसाद द्या – प्राजक्ता लवंगारे-वर्मा

विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला

नागपूर: जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देवून ते सोडविण्यासाठी महसूल यंत्रणेच्या माध्यमातून मिळणारा प्रतिसाद महत्त्वाचा आहे. त्यासाठी विकास कामांची कालमर्यादा पाळा, अशा सूचना नव्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज दिल्यात.

नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त म्हणून आज पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. अधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.

महसूल विभाग हा शासनाचा चेहरा असून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दैनंदिन कामामधून जनतेला अधिक लोकाभिमूख व परिणामकारक प्रशासन देण्याला प्राधान्य द्यावे, असे सांगताना श्रीमती वर्मा म्हणाल्या की, कोरोना काळात नागपूर विभागाने अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने नियोजन केले होते. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत झाली. नैसर्गिक आपत्तीच्या काळातही अशाच पद्धतीने विभागात काम करण्याची आवश्यकता आहे. अधिकाऱ्यांनी सोपवलेल्या कामाच्या वेळा निश्चित करुन त्या कालमर्यादेत सोडविण्याला प्राधान्य द्यावे, असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.

विभागीय आयुक्तालय हे नियंत्रण अधिकाऱ्याच्या भूमिकेत न राहता जिल्हास्तरीय यंत्रणेला पूरक म्हणून काम करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्याने स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेण्यासोबतच केवळ जिल्ह्यातून आलेल्या अहवालावर विसंबून न राहता शेवटच्या घटकाकडून मिळणारा प्रतिसाद यावर अधिक काम करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी बैठकीत सांगितले.


पदभार स्वीकारल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या विविध विभागांचा आढावा घेतला. दैनंदिन कामामध्ये येणाऱ्या अडचणी, प्रलंबित असलेले प्रश्न तसेच ते सोडविण्यासाठी विभाग प्रमुखांकडे होत असलेली कार्यवाही याबद्दल श्रीमती वर्मा यांनी विभागनिहाय माहिती घेतली. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त संजय धिवरे, महसूल उपायुक्त मिलिंद साळवे, उपायुक्त सर्वश्री चंद्रभान पराते, शैलेंद्र मेश्राम, धनंजय सुटे, अंकुश केदार, रमेश आडे, श्रीमती राजलक्ष्मी शहा, श्रीमती रेश्मा माळी तसेच सहाय्यक आयुक्त व विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला
भारतीय प्रशासन सेवेतील 2001 च्या तुकडीच्या सनदी अधिकारी असलेल्या श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथून प्रांत अधिकारी या पदापासून प्रशासकीय सेवेला सुरुवात केली. मराठी भाषा विभागाच्या सचिव या पदावर कार्यरत असताना श्रीमती वर्मा यांनी शासनाने नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त पदावर त्यांची नियुक्ती केली. त्या नागपूर विभागाच्या पहिल्या महिला आयुक्त आहेत. आज दुपारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याकडून नवीन पदाची सूत्रे स्वीकारली.

श्रीमती वर्मा यांनी यापूर्वी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, धुळेच्या जिल्हाधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक, सह विक्रीकर आयुक्त, मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव, राज्य उत्पाद शुल्क आयुक्त, सिडको सहव्यवस्थापकीय संचालक अशा विविध पदावर त्यांनी यापूर्वी काम केले आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच लोकाभिमुख प्रशासनासाठी त्यांचा गौरव झाला आहे.