Published On : Mon, Jun 26th, 2023
By Nagpur Today Nagpur News

आदरणीय पवारसाहेब, पोरकट…; चंद्रशेखर बावनकुळेंचा शरद पवारांवर पलटवार

मुंबई – पाटण्यामध्ये विरोधी पक्ष नेते मोदी सरकारविरोधात एकत्रित आले होते. मात्र याठिकाणी १९ विरोधी पक्ष नसून १९ पंतप्रधान जमले होते, अशी टीका करणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले. त्यावर बावनकुळेंनी यांनी ट्विट करत पवारांवर पलटवार केला.

आदरणीय पवार साहेब, पोरकट आणि स्वतःच्याच मुलाबाळांना सत्ता मिळाली म्हणून कोण राजकारण करत आहे हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्याध्यक्ष निवडताना सुद्धा तुम्हाला राष्ट्रवादीचा सच्चा कार्यकर्ता दिसला नाही आणि तुम्ही सुप्रियाताईंच्या हाती सूत्रं दिली यातच सर्व आले, असे ट्विट करत बावनकुळे यांनी पवारांना प्रत्युत्तर दिले.

कार्याध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करायची हा तुमचा प्रश्न आहे. पण देश वाचविण्याच्या नावाखाली तुम्ही विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहात. तुमची एकजूट देशासाठी नाही तर तुमच्या परिवाराला सत्ता मिळावी यासाठी आहे. हे लोकांना माहीत आहे.मोदींच्या नेतृत्त्वाखाली गेल्या नऊ वर्षांत जनतेचे राज्य चालू आहे.

पण तुम्हाला ते बघवत नाही. म्हणून तुम्ही आमच्या राजकारणाला पोरकट राजकारण म्हणून हिणवत आहात. पण जनता तुमच्या ‘मेरा घर – मेरे बच्चे’ मोहिमेला साथ देणार नाही. कोण पोरकट राजकारण करतंय आणि कोण देशहिताचे राजकारण करतंय? हे २०२४ मध्ये जनता तुम्हाला दाखवून देईल, असेही बावनकुळे ट्विटमध्ये म्हणाले.

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.