समाधानी ग्राहकांकडून मार्च महिन्यात १७ कोटींचा भरणा
५० टक्के रक्कम माफ होण्याचा आजचा शेवटचा दिवस
नागपूर : कृषीसह अन्य वर्गवारीतली ग्राहकांच्या शंकांचे निवारण करण्यासाठी नागपूर परिमंडलात आयोजित ७६ ग्राहक मेळाव्यात सुमारे १६७६ तक्रारींचे निराकरण करण्यात आले. यात वीज देयकाबाबत सर्वाधिक तक्रारी होत्या. मेळाव्यात या तक्रारींची सोडवणूक झाल्याने समाधानी कृषी ग्राहकांनी मार्च महिन्यात १७.१५ कोटी रुपयांच्या वीज बिलांचा भरणा केला.
महावितरणच्या ग्राहकांच्या तक्रारीचे तात्काळ निराकरण व्हावे, यासाठी ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या निर्देशनानुसार १० ते २२ मार्च २०२२ या दरम्यान नागपूर परिमंडलात उपविभागस्तरावर ७६ मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी व नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले.
या मेळाव्यात १५४३ कृषी ग्राहकांनी वीज देयकाबाबत तक्रारी दिल्या. त्यापैकी ८३८ तक्रारीं मेळाव्यातच सोडविण्यात आल्या.बिलिंग व्यतिरिक्त ९३ तक्रारींपैकी ७५ तक्रारींची सोडवणूक मेळाव्यात करण्यात आली. ज्या तक्रारीत अधिक माहिती घेणे,तांत्रिक बाबी तपासणे गरजेचे आहे अशा तक्रारींची नोंद घेण्यात आली असून त्या तत्परतेने सोडविण्याची प्रक्रिया सुरु आहे. मेळाव्यात कृषी वीज जोडणी धोरणाची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच ग्राहकांच्या शंकांचे समाधान करण्यात आले.त्यामुळे मेळाव्याचा लाभ घेत ६१०० शेतकऱ्यांनी मेळाव्यातच ३.५ कोटी रुपयांच्या चालू तसेच थकीत वीज बिलांचा भरणा केला. मेळाव्यांच्या माध्यमातून जनजागृती झाल्याने मार्च महिन्यात २४४६७ शेतकऱ्यांनी १७.१५ कोटी रुपयांचे वीज बिल भरले.
कृषी ग्राहकांसह शहरी भागातील सर्व वर्गवारीतील ग्राहकांसाठीही अनेक ठिकाणी मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा लाभ शेकडो ग्राहकांनी घेतला. त्यांच्याही समस्यांचे समाधान या ग्राहक मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात आले. या वर्गवारीतील १४९३ ग्राहकांनी मेळाव्यात सहभागी होत २६.७५ लाख रुपयांचे चालू अथवा थकीत वीज बिल भरले.
महावितरणच्या कृषी वीज जोडणी धोरणाला नागपूर परिमंडलात चांगला प्रतिसाद मिळत असून या धोरणाचा लाभ घेत ८१८३० शेतकऱ्यांनी ८७.११ कोटी रुपयांच्या वीज बिलांचा भरणा केला आहे. ३१ मार्च २०२२ पर्यंत थकबाकीच्या ५० टक्के रक्कम भरलो तरी उर्वरित रक्कम माफ होणार आहे.त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या धोरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले आहे.