नागपूर: वाढीव विद्यावेतनासह इतर मागण्यांसाठी नागपूरसह राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने संप पुकारला आहे. नागपुरात निवासी डॉक्टरांनी गुरूवारी संध्याकाळपासून संप सुरू केला रूग्णालय परिसरात त्यांनी निदर्शने केली. यामुळे रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी मार्डला विद्यावेतन वाढवण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी पूर्वी आंदोलन स्थगित केले होते. परंतु सरकारने अद्यापही लेखी दिले नसल्याने निवासी डॉक्टरांनी पुन्हा संपाचा पवित्रा घेतला.
या संपामुळे शासकीय रुग्णालयातील रुग्णसेवा विस्कळीत झाली असून वैद्यकीय शिक्षण खात्याकडून सगळ्याच महाविद्यालयातील अधिष्ठात्यांसह वैद्यकीय अधिक्षकांना रुग्ण सेवेवर परिणाम होऊ नये म्हणून आवश्यक उपाय करण्याचे आदेश दिले गेले आहे. दरम्यान नागपुरातील मेडिकल, मेयोसह राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मोठ्या संख्येने निवासी डॉक्टर कार्यरत आहे. या संपामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.