Published On : Tue, Apr 3rd, 2018

रस्त्यावर राहणा-या बालकांचा मनपा करणार सर्व्हे

Advertisement


नागपूर: रस्त्यावर राहणा-या बालकांचा नागपूर महानगरपालिका सर्वे करणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण समिती प्रगती पाटील यांनी दिली. मंगळवारी (ता.३) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी समिती सदस्या दिव्या धुरडे, रश्मी धुर्वे, मनिषा अतकरे, वैशाली नारनवरे, खान नसिम बानो मो. इब्राहिम , जिशानमुमताज मो.इरफान अंसारी, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, कार्यकारी अभियंता अनिरूद्ध चौंगजकर, गिरिश वासनिक, उद्यान अधीक्षक अमोल चोरपगार, बाजार अधीक्षक मदन सुभेदार प्रामुख्याने उपस्थित होते.

रस्त्यावर राहणा-या बालकांचा सर्व्हे करण्याकरिता मनपाच्यावतीने कृतीदल तयार करण्यात आला आहे. या कृतीदलात उपायुक्त (समाजकल्याण अधिकारी), सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन विभाग), आरोग्य अधिकारी, शिक्षणाधिकारी, अप्पर कामगार आयुक्त कार्यालय, लिपिक समाज कल्याण विभाग, नागपूर, पोलिस निरिक्षक, सदर पोलिस स्थानक, अर्चना श्रीवास्तव एनजीओ यांचा समावेश असणार आहे. कृती दलामार्फत त्या बालकांचे वर्गीकरण या दलांमार्फत करण्यात येणार आहे. या दलांमार्फत त्यांची जपवणूक व पालन पोषण करण्यात येणार असल्याची माहिती सभापती पाटील यांनी दिली.

नागपूर शहरातील दिव्यांगाचा सर्व्हे करण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याण विभागाद्वारे बैठकीत देण्यात आली. २०१४-१५ मध्ये दिव्यांगाचा सर्व्हे करण्यात आला होता. त्यामध्ये ७९५७ अपंग बांधव शहरात असल्याची माहिती विभागाद्वारे देण्यात आली. या वर्षीही सर्व्हे झोननिहाय करण्यात येणार आहे. यावर बोलताना सभापती पाटील यांनी झोननिहाय अपंगांची यादी झोनच्या नगरसेवकांना देण्यात यावी, असे निर्देश दिले.

यावेळी पथविक्रेता धोरणाबाबत बाजार विभागाने केलेल्या मागील वर्षीचा आढावा सभापती प्रगती पाटील यांनी घेतला. याबाबत बोलताना सभापती पाटील यांनी पथविक्रेत्यांचे नव्याने सर्वेक्षण करण्यात यावे, त्यांना ओळखपत्रदेखील प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मनपाच्या शाळेत सॅनिटरी नॅपकीन मशीन्स लावण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.

गरजू महिलांना समाजकल्याण विभागाद्वारे काचबटन आणि शिवणयंत्र वाटपासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. त्याचा खर्च २५ लक्षच्या वर असल्याने तो प्रस्ताव स्थायी समितीपुढे सादर करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाद्वारे देण्यात आली.

उद्यान विभागाद्वारे महिला बचत गटातील महिलांना उद्यानाच्या कामाचे प्रशिक्षण देण्यासंदर्भात चर्चा झाली. यावेळी शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही प्रशिक्षण देण्यात यावे, अशी सूचना केली. त्यावर बोलताना सभापती प्रगती पाटील यांनी संमती दिली. व प्रशिक्षणाची नियमावली शिथील करण्यात यावी, असे निर्देश दिले.

बैठकीला समाज कल्याण विभागाचे शेखर पाचोडे, शारदा गडकर, विनय त्रिकोलवार, प्रमोद वाघमारे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.