Published On : Thu, Jun 6th, 2019

पर्यावरण रक्षणासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक-चंद्रशेखर बावनकुळे

पालकमंत्र्यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदेचे उदघाटन

नागपूर: 21 व्या शतकातील पर्यावरणातील प्रदूषण हे प्रमुख आव्हान आहे. समाजामध्ये पर्यावरणाची समस्या व संवर्धनाविषयी जागृकता निर्माण व्हावी, पर्यावरणासाठी पोषक वातावरणाची निर्मिती करुन पर्यावरणाचे रक्षण व्हावे यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

महानिर्मितीच्या विद्यमाने “औष्णिक ऊर्जा : रसायनशास्त्र आणि शाश्वत पर्यावरण–2019” या विषयावर तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन आज हॉटेल तुली इम्पेरीयल, रामदासपेठ येथे करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून एक दिवसीय परिषदेचे यजमानपद चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र यांचेकडे होते.

Advertisement

यावेळी आमदार समीर मेघे, महानिर्मितीचे संचालक (संचलन) चंद्रकांत थोटवे, पर्यावरण तज्ज्ञ तथा एनजीओचे संस्थापक देबी गोयंका, अरुण कृष्णमूर्ती, माजी कुलगुरु विलास सपकाळ, मुख्य शास्त्रज्ञ श्रीपाल सिंग, महाऔष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूरचे मुख्य अभियंता राजू घुगे, अभय हरणे, राजकुमार तासकर वरिष्ठ रसायनशास्त्रज्ञ डॉ. विजय येवूल, कार्यकारी रसायन शास्त्रज्ञ डी.एम. शिवणकर प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement

परिषदेला मार्गदर्शन करताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, तापमान वाढीच्या परिणामामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. ग्लोबल वार्मिंग ही आज संपूर्ण जगाची समस्या बनली आहे. तीव्र वातावरणीय बदलामुळे शेतीवर मोठे संकट आहे. दुष्काळात तीव्र पाणी टंचाईमुळे शेतकरी संकटात आहे. शहरात वाहतुकीमुळे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या उद्योगधंदयामुळे नदी-नाले देखील प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. यावर उपाय म्हणून शासनासोबतच नागरिकांनी पर्यावरण रक्षणासाठी समोर यावे. पर्यावरण रक्षण हे जनआंदोलन व्हावे. आपल्या देशाला सौर ऊर्जेचे वरदान मिळाले आहे. यासाठी जास्तीत जास्त सौर ऊर्जेचा वापर करणे काळाची गरज आहे. जुन्या तंत्रज्ञानाला बाजुला सारुन विविध उद्योगधंदे, हॉटेल्स, दवाखाने, शाळा येथील सर्व व्यवस्था सौर ऊर्जेवर करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

पर्यावरण रक्षणासाठी महाजेनकोने आयोजित केलेला उपक्रम स्तुत्य असुन महाजेनकोने प्रत्येक घरासमोर दोन झाडे लावण्याचा उपक्रम राबवावा. महाजेनकोने रोपवाटीका विकसित कराव्यात. आपले शहर पर्यावरणपूरक बनावे यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. प्लॅस्टीकचा वापर आवश्यकतेनुसारच करावा. वायू प्रदूषण रोखण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवावा. पर्यावरणाचे काम हे देशसेवेचे काम असून पर्यावरणाचा रक्षणासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. पर्यावरण विषयक अभ्यास करण्यासाठी इच्छुक अधिकारी,वैज्ञानिक, रसायनशास्त्रज्ञ, विद्यार्थी तसेच पर्यावरणप्रेमींनी समोर यावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

या परिषदेत पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ देबी गोयंका, डॉ.श्रीपाल सिंग, डॉ. संजय ढोबळे, डॉ. नीरज खटी, डॉ.बागची, डॉ.आर.आर.खापेकर, डॉ.संजय दानव, डॉ.अश्विनी दानव-बोधाने, विवेक घोडमारे यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणातून चंद्रकांत थोटवे यांनी मानव आणि पर्यावरणाचे नाते सांगतांना लोकसंख्येमुळे पर्यावरणावर झालेल्या विपरीत परिणामांची त्यांनी सुरेख उकल केली. उद्योगाच्या ठिकाणी आज पर्यावरण सजगता निर्माण झाल्याने चांगले परिणाम दिसून येत आहे. अश्या परिषदांमधून प्रदूषण कमी करण्यास जे-जे अपेक्षित आहे ते करण्यास महानिर्मिती तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

औद्योगिकरणामुळे प्रदूषण वाढीस सुरुवात झाली व आजतागायत वाढतच आहे व त्याचे भीषण परिणाम दिसून येत आहे.त्यावर नवनवीन कल्पना, ठोस उपाययोजना म्हणून ही परिषद असल्याचे प्रास्ताविकातून मुख्य अभियंता राजू घुगे यांनी सांगितले. समारंभाचे सूत्र संचलन वैशाली चौधरी व माया डफाडे यांनी तर आभार प्रदर्शन दौलत शिवणकर यांनी केले.

परिषदेला पर्यावरण, विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञ, रसायनशास्त्रज्ञ अधिकारी-अभियंते तसेच महानिर्मितीचे उप मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते, रिलायन्स पॉवर, छत्तीसगढ पॉवर, तेलंगाना पॉवर, तामिळनाडू पॉवर कोर्पोरेशन, निरी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नागपूर विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ, सामाजिक संस्था प्रतिनिधी तसेच महानिर्मितीच्या औष्णिक विद्युत केंद्रांतील अधिकारी-अभियंते-रसायनशास्त्रज्ञ प्रामुख्याने उपस्थित होते.

देबी गोयंका म्हणाले कि औष्णिक विद्युत केंद्रासारख्या प्रदूषणकारक उद्योगाने अश्या प्रकारची परिषद आयोजित करावी हि कौतुकाची बाब आहे. वातावरणातील बदल टिपण्यासाठी व त्यावर उपाय योजना करण्यासाठी आपल्या विचारात बदल घडविण्याची गरज आहे. हरित ऊर्जा हि येणाऱ्या काळाची गरज आहे व त्याशिवाय तरणोपाय नाही हे लक्षात घ्यावे लागेल.

डॉ.विलास सपकाळ म्हणाले कि, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र हे प्रदुषणाच्या मुद्द्यांवर संवेदनशील आहे. आगामी काळात औष्णिक उर्जेसोबत इतर ऊर्जा निर्मितीची सरमिसळ करावी लागणार आहे. आपल्या नेहमीच्या जीवनशैलीमध्ये बदल घडवूनही उर्जेची बचत करता येणे शक्य आहे. त्यासाठी पर्यावरण विषयक गांभीर्य, निश्चय आणि जबाबदारी स्वीकारायला हवी.

अरुण कृष्णमुर्ती म्हणाले कि पाण्याचे दुर्भिक्ष्य व प्रदूषण रोखण्यासाठी सरोवरांची साफसफाई हि एक महत्वाची उपाययोजना आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी उंचावण्यासाठी सरोवरांचे पुनर्जीवन करावेच लागेल व त्यासाठी उपलब्ध मनुष्यबळानी लोकसहभागाद्वारे एकत्रित येऊन काम करणे गरजेचे आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement