Published On : Mon, Jun 27th, 2022

कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या प्रतिनिधींची मेट्रो स्थानकांना भेट

Advertisement

स्थानकांवरील व्यावसायिक कामाकरिता उपलब्ध असलेल्या जागा संबंधी घेतली माहिती

नागपूर: नागपूर शहरात मेट्रो प्रकल्प राबवताना, महा मेट्रोने प्रॉपर्टी डेव्हलपमेंट सारख्या महत्वाच्या विषयाला अनुसरून स्थानकावर व्यावसायिक कामाकरता जागा उपलब्ध करून दिली आहे. त्या प्रमाणे काही मेट्रो स्थानकांवर व्यावसायिक प्रतिष्ठाने देखील स्थापली गेली आहे. व्यावसायिक उपयोगाकरता उपलब्ध असलेल्या जागांची माहिती घेण्याकरता आज कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या (केट) च्या प्रतिनिधींनी आज मेट्रो स्थानकांना भेट दिली.

महा मेट्रोच्या एअरपोर्ट साऊथ मेट्रो स्थानकावरील कन्व्हेन्शन सेंटर येथे कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या (केट) – या देशातील विविध व्यापारी संस्थांच्या सर्वोच्च संघटनेची दोन दिवसीय राष्ट्रीय पातळीची बैठक आज संपन्न झाली. बैठकीच्या पहिल्या दिवशी केट तर्फे महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित यांचा भव्य सत्कार करण्यात आला. या बैठकीत देशातील विविध राज्यातील व्यापारी सहभागी झाले आहेत. बैठकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी म्हणजे आज (२६ जून) रोजी केट प्रतिनिधींनी मेट्रो स्थानकांना भेट दिली.

या दौऱ्यात बैठकीकरता आलेले देशाच्या विविध भागातील व्यापारी देखील सहभागी झाले होते. महा मेट्रोच्या प्रॉपर्टी डेव्हलपमेंट विषयाला अनुसरून संपूर्ण माहिती पदाधिकाऱ्यांनी जाणून घेतली. महा मेट्रो तर्फे वरिष्ठ अतिरिक्त महाव्यवस्थापक (प्रॉपर्टी डेव्हलपमेंट) श्री संदीप बापट यांनी स्टेशन वर व्यावसायिक कामाकरता जागा घेण्याकरता आवश्यक असलेल्या बाबींची माहिती दिली. केट च्या प्रतिनिधींनी विविध स्थानकांची पाहणी करत त्या संबंधी आपल्या शंकांचे समाधान केले.

मेट्रो तर्फे राबवल्या जाणाऱ्या प्रॉपर्टी डेव्हलपमेंट संकल्पनेची तारीफ करत व्यापाऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केट चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बीसी भरतीया यांनी केले. भविष्यात मेट्रोची स्थानके व्यावसायिक केंद्र होणार असून व्यापारी वर्गाने याची जाणीव ठेवावी असे देखील ते म्हणाले. नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री प्रभाकर देशमुख यांनी मेट्रो स्थानकांवर असलेल्या जागा व्यापाराच्या दृष्टीने उपयुक्त असल्याचे सांगितले.

तर मेट्रो स्थानकांवर व्यावसायिक कामाकरिता उपलब्ध जागांमुळे व्यवसायाला चालना मिळेल असे श्री ज्ञानेश्वर रक्षक आणि किशोर धाराशिवकर म्हणाले. एकूण महा मेट्रो तर्फे राबल्या जाणाऱ्या या संकल्पनेमुळे व्यापाऱ्यांचा लाभ होईल हि भावना व्यापारी वर्गात आहे.