Published On : Sat, Sep 8th, 2018

वाठोडा चौक ते गिड्डोबा मंदिर रस्ता दुरूस्ती करा

नागपूर: वाठोडा चौक ते गिड्डोबा मंदिर मार्गावर ठिकठिकाणी गड्डे पडले आहे. रस्त्यावर त्वरित डांबरीकरण करण्याच्या मागणीचे परिसरातील नागरिकांनी नेहरू नगर झोनचे सहाय्यक आयुक्तांना उप अभियंता (लोककर्म) एस. पी. रक्षमवार यांच्यामार्फत शुक्रवारी (७ सप्टेंबर) निवेदन देण्यात आले.

परिसरातील रामभूमी सोसायटी, सरोदेनगर, गिड्डोबानगर, श्रीरामनगर, कीर्तीधर सोसायटी, गजानन नगर, कामाक्षी सोसायटी, न्यू संगमनगर यासह वसाहतीमधील हजारो नागरिकांना दैनंदिन कामकाजाकरिता तसेच विद्यार्थ्यांना शालेय कामानिमित्त ये-जा करण्याकरिता हाच मुख्य मार्ग आहे. हा मार्ग जवळपास ९-१० वर्षांपूर्वी म्हणजेच माजी मंत्री सतिश चतुर्वेदी यांच्या काळात झालेला आहे. यानंतर साधी डांगडुजीसुद्धा नंतरच्या कार्यकाळात झाली नाही.

यातच सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या बांधकामाकरिता हजारो जड वाहतूकीचे ट्रक मार्गावरून गेल्याने रस्ता उपराजधानीतील न राहता पांदन रस्त्यासारखी दयनिय अवस्था झाली आहे, असा नागरिकांचा आरोप आहे.

दररोज विद्यार्थी, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या अपघात होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये संबंधित अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींविरोधात तीव्र असंतोष आहे. याचा कोणत्याहीक्षणी भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गंभीर समस्येची आपण दखल घेऊन त्वरित रस्ता दुरूस्तीकरणाची कार्यवाही करण्याची नागरिकांनी मागणी तसेच येत्या आठ दिवसांत मागणीची पुर्तता न झाल्यास सर्व त्रस्त नागरिक रस्त्यावर उतरून जन आंदोलन करतील, अशा इशाराही देण्यात आला.

शिष्टमंडळात प्रमोद बायस्कर, अमित अवचट, सोमेश्वर नागदेवते, किशोर मेश्राम, प्रवीण कातकडे, कमलेश वºहाडे, गौरव बिडवाईक, संकेत गायधने, सौरभ चहांदे आदिंचा समावेश होता.