नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या दवाखान्याची अवस्था देखरेखीअभावी वाईट आहे. दवाखान्याची दुरूस्ती प्राधान्याने करावी, असे निर्देश वैद्यकीय सेवा व आरोग्य सेवा समिती सभापती मनोज चापले यांनी दिले.
बुधवार (ता.१७) ला मनपाच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या दवाखान्याची पाहणी प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी त्यांचा समवेत वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी, कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष राजेश होथीबेड, जीवन पराते प्रामुख्याने उपस्थित होते.
सभापती मनोज चापले यांनी शहीद चौकातील दाजी हॉस्पीटल, गोळीबार चौक येथील नेताजी हॉस्पीटल, महाल येथील दटके हॉस्पीटल, टेलिफोन एक्सचेंज येथील चकोले हॉस्पीटलची पाहणी केली. मनपाच्या दवाखान्याची दुरूस्ती व देखभाल ही समितीच्या वतीने करण्यात येत आहे. सभापती चापले यांनी सर्वप्रथम शहीद चौकातील दाजी दवाखान्याला भेट दिली व तेथील समस्या जाणून घेतल्या. विद्युत पुरवठा वारंवार खंडित असल्याने अंधाराचे साम्राज्य तेथे असते. ते तातडीने दुरूस्त करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. महिलांसाठी शौचालयाची व्यवस्था त्याठिकाणी करण्यात यावी, असे आदेश चापले यांनी दिले. दवाखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ दवाखान्याच्या नावाचे फलक लावण्याचे अधिकाऱ्यांना सूचित केले. यावेळी दाजी हॉस्पीटलच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.मंजुषा मठपती उपस्थित होत्या.
यानंतर सभापतींनी नेताजी हॉस्पीटलची पाहणी केली. नेताजी हॉस्पीटलमध्ये भिंतीवर रंगरंगोटी करण्याचे निर्देशित केले. त्या ठिकाणी मोठ्या डस्टबिनची व्यवस्था तातडीने करण्यात यावी, असे आदेश दिले. शौचालयदेखील खूप खराब असल्याचे आढळून आले. याबाबत सभापतींनी नाराजी व्यक्त करीत ते लवकरात लवकर दुरूस्त करण्याचे निर्देश दिले. चकोले हॉस्पीटलमधील टी.बी. रूग्णांची रूम स्वच्छ नसल्याने सभापती चापले यांनी संताप व्यक्त केला व ती तातडीने दुरूस्त करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देशित केले.
महाल येथील दटके रोग निदान केंद्राची पाहणी सभापती चापले यांनी केली. तेथील व्यायाम कक्ष, बाह्यरूग्ण कक्ष, डेंग्यूसारख्या रोगावर होणारा अंतिम उपचार याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. नव्याने तयार झालेल्या आय सेंटरलासुद्धा त्यांनी यावेळी भेट दिली. त्यांच्यासमवेत मंगेश धार्मिक, कार्तिक रोकडे प्रामुख्याने उपस्थित होते.
