नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढल्यानंतर मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे सातत्याने मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी विरोध करत असल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उडाली.सत्ताधारी गटाकडूनही छगन भुजबळ यांचा विरोध करण्यात येत आहे.
मराठा आरक्षणाच्या अध्यादेशावरून छगन भुजबळ मंत्रिपदाचा राजीनामा देऊ शकतात, अशी चर्चा होत असताना शिंदे गटाच्या नेत्यांनी भुजबळ यांची हकालपट्टी करावी, या मागणीने जोर धरला आहे. छगन भुजबळ हे मराठा समाजाच्याविरोधात तिरस्काराची भावना ठेवून बोलत आहेत.
हे योग्य नाही, अशा मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवता कामा नये, त्यांची हकालपट्टी करावी. मंत्रिपद घेताना सर्वांना समान न्याय देण्याची शपथ घेतली जाते, अशावेळी भुजबळ एका समाजाचा तिरस्कार कसा काय करू शकतात? असा प्रश्न शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी उपस्थित केला.