सदस्यांचा अपमान केलात तर याद राखा – विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांचा सज्जड दम


नागपूर: राज्यातील तमाम सर्व खात्याच्या मस्तवाल अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की, यापुढे कुठल्याही सदस्याचा अपमान केला तर याद राखा. हे सभागृह त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा सज्जड दम विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी आज सदस्य हक्कभंग प्रस्तावावर बोलताना दिला.

नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार दिपिका चव्हाण यांचा तहसिलदाराने अपमान केला होता. त्यामुळे त्यांच्यावर दीड वर्षापूर्वी विशेष अधिकार हक्कभंगाचा प्रस्ताव त्यांनी दिला होता. परंतु दीड वर्ष झाले तरी त्याच्यावर कारवाई झाली नसल्याचा मुद्दा सभागृहामध्ये चर्चेला आला असताना विधीमंडळ पक्षनेते अजित पवार आक्रमक झाले. सदस्यांना अशी वागणूक अधिकारी कशी काय देवू शकतात. मस्तवालपणा करणारा, चुकीचं वागणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही. दीड वर्षाने तो अधिकारी कसा काय मॅटमध्ये जावू शकतो असा संतप्त सवाल करत अजित पवार यांनी सभागृहातील सर्व सदस्यांची बाजु घेतली.

दरम्यान गटनेते जयंत पाटील यांनीही या चर्चेत भाग घेत सदस्यांचे अधिकार अबाधित राखण्याची मागणी केली. सदस्यांच्या हक्काबाबत सभागृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी मांडलेल्या मुद्दयाला सर्व सदस्य पाठिंबा देताना दिसले.

दरम्यान अजित पवार यांचा आक्रमकपणा पाहताच महसुमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तहसिलदार सुनिल सौंदाणे या अधिकाऱ्याला निलंबित करत असल्याची घोषणा केली परंतु यावर समाधानी नसलेल्या अजित पवार यांनी सदस्यांचा अपमान करणाऱ्या तिन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी केली. त्यावर संसदीय कामकाजमंत्री गिरीष बापट यांनी सर्व गटनेत्यांची बैठक अध्यक्षांच्या दालनामध्ये घेवून निर्णय घेतला जाईल असे जाहीर केले. बैठकीनंतर संसदीय कामकाजमंत्री गिरीष बापट यांनी आमदार दिपिका चव्हाण यांचा अपमान करणाऱ्या तहसिलदाराला निलंबित केले आहे आणि बाकीच्या दोन सदस्यांच्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री विशेष लक्ष घालून कारवाई करणार असल्याचे सांगितले.