Published On : Mon, Apr 12th, 2021

रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्ध करावे

नागपूर : नागपुरात कोरोना महामारीने कहर केला आहे. कोरोनावरील उपचारामध्ये रेमडेसीवीर हे इंजेक्शन रुग्णांसाठी अत्यंत आवश्यक मानले गेले आहे. आवश्यक औषधीमध्ये याचा समावेश असून सामान्य लोकांना त्याची टंचाई भासत आहे. काळाबाजाराचाही फटका बसत असून इंजेक्शन नागरिकांना लवकर उपलब्ध करण्याचे निवेदन माजी स्थायी समिती सभापती श्री. विजय (पिंटू) झलके, श्री. प्रदीप पोहाणे, माजी उपमहापौर श्री. दिपराज पार्डीकर आणि नगरसेवक श्री. भगवान मेंढे यांनी केले आहे.

या संबंधाचे एक निवेदन अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांना देण्यात आले या निवेदनात डे केयर रुग्णांसाठी इंजेक्शनची व्यवस्था करणे आणि काळाबाजारी करणा-यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावे, असेही नमूद करण्यात आले आहे.

झलके यांनी म्हटले की, शहरात व जिल्हयात कोव्हिडचा वाढता प्रकोप लक्षात घेता रुग्ण संख्येत मोठया प्रमाणात वाढ होत आहे. ग्रामीण भागात आरोग्य सुविधा अद्यावत नसल्याने त्याचा संपूर्ण भार हा नागपूर शहराचा आरोग्य व्यवस्थेवर येत असून शहरातील शासकीय तसेच खाजगी दवाखान्यातील बेडस उपलब्ध नसल्याने ही स्थिती दिवसेंदिवस विदारक होत चालली आहे. मनपा प्रशासन यांनी राज्य शासनाला निवेदन करुन नागपूरसाठी प्रस्तावित १००० बेडसचा अस्थायी रुग्णालय खोलण्याची अपील करावी, असे नमूद केले आहे.