Published On : Sat, Jan 13th, 2018

मनपाद्वारे संचालित ग्रंथालयाचे नियमित निरीक्षण करा

Advertisement


नागपूर: नागपूर महानगरपालिकेद्वारे संचालित वाचनालय आणि अध्ययन केंद्रांचे संचालन व व्यवस्थापन महिला बचत गट, स्वयंसेवी संस्थांद्वारे करण्यात येते. त्यांच्या माध्यमातून त्याचे संचालन व्यवस्थितरीत्या होते अथवा नाही, याची वेळोवेळी तपासणी मनपाच्या ग्रंथालय विभागाने नेमलेल्या निरीक्षकांकडून करण्यात यावी. त्याचा नियमित अहवाल देण्यात यावा, असे निर्देश मापौर नंदा जिचकार यांनी दिले.

यासंदर्भात महापौर नंदा जिचकार यांनी शुक्रवारी (ता. १२) त्यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेल्या विशेष समितीची बैठक घेतली. बैठकीला समितीचे सदस्य उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे सभापती संदीप जाधव, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, निगम सचिव हरिश दुबे, ग्रंथालय अधीक्षक शर्मा उपस्थित होते.

ग्रंथालयासंदर्भात काही नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होत असल्याची बाब महापौर नंदा जिचकार यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. ज्या ग्रंथालयांमध्ये पुस्तके कमी आहेत, तेथे तातडीने नवी पुस्तके खरेदी करण्यात यावी. वाचनालये ठरवून दिलेल्या वेळेत उघडण्यात यावीत. स्वच्छता आणि व्यवस्थापन यावर भर द्यावा. ज्या स्वयंसेवी संस्था व्यवस्थापनात हलगर्जीपणा करीत असतील त्यांना तातडीने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. वाचनालयांमध्ये वर्तमानपत्रांसोबतच पाक्षिक, मासिकांची नागरिकांची मागणी आहे. त्यामुळे सर्व वाचनालयात महत्त्वाची सर्व पाक्षिके, मासिके उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देशही त्यांनी दिलेत.

जी ग्रंथालये उत्तम आहेत अशा बहुतांश ग्रंथालयात अभ्यासिका विकसित करण्यात यावी, अशी सूचना विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांनी केली. समितीचे सदस्य तथा स्थायी समिती सदस्य संदीप जाधव यांनी नगरसेवकांना विश्वासात घेऊन वाचनालयाचे संचालन करण्यात यावे, असे सांगितले. वाचनालयासंदर्भात जुन्या नगरसेवकांचेही अभिप्राय घेण्यात यावे, अशी सूचना समिती सदस्य व उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी केली.

या सर्व बाबींचा आढावा घेण्यासाठी पुढील आठवड्यात समितीची पुन्हा बैठक घेण्यात येईल. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व तपशीलासह माहिती सादर करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.