Published On : Mon, Jul 15th, 2019

आश्रमशाळेतील विद्यार्थिनींची नियमित आरोग्य तपासणी करण्यात यावी

आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके

* पिण्याचे पाणी व अन्य सुविधा द्याव्यात

* निधीचा विहीत पध्दतीने खर्च होणे गरजेचे

नागपूर : आश्रमशाळेतील विद्यार्थिनींची महिला वैद्यकीय अधिका-यांकडून नियमित तपासणी करण्यात यावी. तसेच त्यांना आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा देण्यात याव्यात,असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य खनिकर्म मंडळाचे अध्यक्ष आशीष जैस्वाल, जिल्हा परिषद अध्यक्षा निशाताई सावरकर,आमदार डॉ.सुधाकर देशमुख, मल्लिकार्जुन रेड्डी, सुधाकर कोहळे, डॉ.मिलींद माने, अप्पर आदिवासी आयुक्त डॉ.संदीप राठोड, प्रकल्प अधिकारी चव्हाण, हेडाऊ यासह विविध जिल्हा परिषद, बांधकाम विभाग,आरोग्य विभागाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महिला बालविकास विभाग, शिक्षण व आरोग्य विभाग या तिन्ही विभागांनी समन्वयाने काम करावे.विद्यार्थ्यांच्या शिक्षण व आरोग्याबाबत कोणतीही हयगय होणार नाही तसेच आदिवासी योजनेतंर्गत लाभार्थी निवडतांना आदिवासी विकास विभागाला प्रतिनिधी असणे अनिवार्य असल्याची सूचनाही त्यांनी यावेळी दिले.

यावेळी मंत्री महोदयांनी जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमाचा आढावा घेतला.डिबीटीमुळे विभागाच्या कामात पारदर्शकता आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दर तीन महिन्यांनी विभागाचा आढावा घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी प्रकल्प अधिकारी व विभाग निहाय आढावा मंत्री महोदयांनी घेतला. टिसपी व ओटीएसपी या योजनेतील खर्चित निधीची माहीती घेतली. निधीचा विहीत पध्दतीने विनियोग करावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्यात.