Published On : Tue, Nov 22nd, 2022

मोकाट श्वानांना अन्न खाऊ घालण्यासाठी नोंदणी अनिवार्य

Advertisement

ठिकाण, वेळ आणि श्वानांची संख्याही नोंदविणे आवश्यक

नागपूर : नागपूर महानगरपालिका हद्दीमध्ये मोकाट श्वानांना अन्न खाऊ घालणारे नागरिक, प्राणीप्रेमी संस्था, संघटनांना आता मनपामध्ये अर्ज भरून नोंदणी करणे अनिवार्य आहे. मोकाट श्वानांना ज्या ठिकाणी अन्न खाऊ घालत आहे त्या ठिकाणाबाबत सविस्तर माहिती, अन्न खाऊ घालण्याची वेळ, अन्न खाऊ घालत असलेल्या मोकाट श्वानांची अंदाजित संख्या इत्यादी सविस्तर माहिती अर्जामध्ये नमूद करणे आवश्यक आहे, अशी सूचना मनपा उपायुक्त तथा घनकचरा विभागाचे संचालक डॉ. गजेंद्र महल्ले यांनी केली आहे.

मोकाट श्वानांना अन्न खाऊ घालणारे नागरिक तथा प्राणी प्रेमी संस्था आणि संघटनांनी पशुवैद्यकीय सेवा कक्ष, घनकचरा व्यवस्थापन विभाग, पाचवा माळा, नागपूर महानगरपालिका, सिव्हिल लाईन्स येथे अर्ज करावा. 15 दिवसांच्या आत संबंधितांनी मोकाट श्वानांना अन्न खाऊ घालत असलेल्या ठिकाणाबाबतची माहिती विभागाला सादर करावी.

या माहितीच्या आधारे मा. सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेल्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिका हद्दीमध्ये मोकाट शहरांना अन्न खाऊ घालण्याचे ठिकाणे आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून निश्चित करण्यात येईल, असेही डॉ. महल्ले यांनी सांगितले.