Published On : Mon, Feb 12th, 2018

बांधकाम कामगार विशेष नोंदणी अभियान आधी मजुरांची नोंदणी करा, नंतरच कामे सुरु करा : पालकमंत्री

Advertisement

नागपूर​: ​महाराष्ट्र शासनाच्या कायद्यानुसार इमारत बांधकाम व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणार्‍या मजुराची नोंदणी करणे अनिवार्य असून त्यासाठी कामगारांचे विशेष नोंदणी अभियान गेल्या 15 फेब‘ुवारीपासून 15 मार्चपर्यंत बांधकाम कामगार विशेष नोंदणी अभियान सुरु करण्यात आले आहे. बांधकामे करताना आधी मजुरांची नोंदणी करून नंतरच कामे सुरु करावी, अन्यथा बांधकाम करणार्‍या कंत्राटदार आणि शासनाच्या कार्यकारी अभियंत्याला जबाबदार धरून कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवनमध्ये आज या एकाच विषयावर दोन बैठकी घेण्यात आल्यात. या बैठकीला कामगार मंडळाचे सदस्य अशोक भुताड, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, आ. अनिल सोले, आ. सुधाकर कोहळे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, शिक्षण सभापती उकेश चव्हाण, कामगार उपायुक्त व अन्य उपस्थित होते.

बांधकाम कामगार म्हणून 22 प्रकारची कामे शासनाने ठरवून दिली आहे. ती कामे करणार्‍या कामगाराची बांधकाम मजूर म्हणून नोंदणी करावी लागणार आहे. बांधकाम क्षेत्रात काम करणार्‍या कामगारांना शासनाने ठरवून दिलेल्या 19 सुविधा द्याव्या लागणार असून कंत्राटदारांनी या सुविधा कामगारांना द्यायच्या आहेत. जिल्ह्यात सुमारे 40 हजार कामगारांची नोंद अपेक्षित आहे. कामगाराने वर्षातून 90 दिवस काम केले असेल अशा कामगाराला संबंधित कंत्राटदाराचे किंवा शासकीय संस्थेच्या प्राधिकृत अधिकार्‍याचे प्रमाणपत्र लागणार आहे.

सर्व कामगारांना नोंदणी करणे बंधनकारक आहे. शासनाच्या या योजनेत नोंदणी केल्याशिवाय संबंधित कामगाराला बांधकाम क्षेत्रात काम करता येणार नाही, नोंदणी न झाल्यास संबंधित बांधकामाच्या कंत्राटदारास जबाबदार धरण्यात येणार आहे. यासाठी कामगारांच्या नोंदणीची शिबिरे घेण्यात येणार आहेत. शासकीय इमारत बांधकाम करताना नोंदणी न केलेल्या कामगारांना कामावर घेतल्याचे आढळून आले तर कार्यकारी अभियंत्याला जबाबदार धरण्यात येईल. महानगर पालिका, नगर परिषदा, नगर पंचायती, ग‘ामपंचायतींमध्ये कामगारांना नोंदणी करण्यासाठी लागणार्‍या प्रमाणपत्रासाठ़ी प्राधिकृत अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कंत्राटदारांनी व शासकीय संस्थांनी शिबिरे लावून कामगारांच्या विशेष नोंदणी अभियानाला सहकार्य करावे असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

नोंदणी केलेल्या कामगारांना व त्यांच्या पाल्यांना शिक्षण, आरोग्य, अवजारे खरेदीपासून सर्व प्रकारच्या शासनाच्या सुविधा देण्यात येणार आहेत. एवढेच नव्हे तर आगामी काळात घरेही मिळण्याची शक्यता आहे. शासकीय संस्थांनी सर्व बांधकाम व्यावसायिकांना नोटीस देऊन या अभियानाची माहिती द्यावी. बांधकाम कामगारांची नोंदणी न करता काम सुरु केले तर कारवाई अटळ राहील. ग‘ामीण भागात काम करणार्‍या बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यासाठी ग‘ामपंचायतींना कळविण्यात आले आहे. जिल्ह्यात कामगार उपायुक्त कार्यालयातर्फे नोंदणी शिबिरे घेण्यात येत असून या शिबिरांमध्ये कामगारांनी नोंदणी करावी.

महापालिकेच्या 10 झोनमध्ये नोंदणी शिबिर सुरु करण्यात येणार असून नरेगाची कामे करणार्‍या कंत्राटदारांनाही कामगारांची नोंदणी करावी लागणार आहे. याशिवाय येत्या 1 एप्रिलपासून भरारी पथक तयार करा व बांधकामे सुरु असलेल्या ठिकाणी काम करणार्‍या मजुरांची नोंदणी झाली की नाही, याची तपासणी करण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले. शासनाचे बांधकाम करणार्‍या ज्या कंत्राटदार कंपनीला कार्यादेश मिळालेे, त्याच कंपनीचे प्रमाणपत्र नोंदणीसाठी कामगाराला द्यावे, असेही पालकमंत्री म्हणाले.

​​सुरेश भट सभागृहात उद्घाटन
बांधकाम कामगार विशेष नोंदणी अभियानाचे उद्घाटन राज्यात मु‘यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या दिवशी करतील, त्याच दिवशी नागपुरातही कविवर्य सुरेश भट सभागृहात नोंदणी अभियानाचे उद्घाटन केले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिली. या कार्यक‘माला सर्व लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात येणार आहे.