Published On : Mon, May 22nd, 2017

सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांची अर्हतेनुसारच कंत्राटी तत्त्वावर भरती

Fire Meeting photo 22 May 2017 (3)
नागपूर
: सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या पात्रतेनुसारच कंत्राटी तत्त्वावर पुन्हा भरती करण्याचे आदेश नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन समितीचे सभापती संजय बालपांडे यांनी अधिकाऱ्यांना दिले. अग्निशमन समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, उपसभापती प्रमोद चिखले, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन)महेश धामेचा, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना बालपांडे म्हणाले, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची भरती अपेक्षेप्रमाणे होणार असेल तरच त्यांना कंत्राटी तत्त्वावर भरती करण्यात यावे अन्यथा नवीन युवकांना त्यांच्या पात्रतेनुसार भरती करण्यात यावे. यावेळी सहायक स्थानक अधिकारी पदासाठी काढण्यात आलेल्या जाहीरातीवर चर्चा करण्यात आली. या पदभरतीसाठी स्थानिकांना प्रधान्य देण्यात यावे, त्याचप्रमाणे त्यावर योग्य उपाय काढून तो प्रश्न त्वरित सोडविण्यात यावा असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. अग्निशमन विभागाच्या ६९ स्थानक अधिकारी, १३ कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले असून त्यांना अतिरिक्त कामासाठी कार्यालयीन कामकाज करावे लागते. यावर त्वरित तोडगा काढून ज्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे त्यांना नवीन विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी बाहेर पाठवावे, असे आदेश त्यांनी यावेळी दिलेत. विभागासाठी घेतलेल्या साहित्याची माहितीपासून समितीला अवगत करावे अशा सूचनाही बालपांडे यांनी यावेळी दिल्या.

दोन दिवसांपूर्वी कॉटन मार्केटला लागलेल्या आगीवर त्वरित नियंत्रण मिळविल्याबद्दल सभापती संजय बालपांडे यांनी विभागाचे आभार मानले. आग विझविताना रस्त्यांवरील बांधकामामुळे अडचणीचा सामना करावा लागला होता. हा त्रास पुन्हा होऊ नये म्हणून गर्दीच्या ठिकाणी हॅड्रन्टच्या वापर करण्यात यावा. याबाबत ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

बैठकीला समितीचे सदस्य राजकुमार साहु, वनिता दांडेकर, सैय्यदा बेगम मो. निजामुद्दीन अंसारी, ममता सहारे, सहायक प्रमुख अग्निशमन अधिकारी बी. पी. चंदनखेडे तसेच विभागातील सर्व स्थानक अधिकारी उपस्थित होते.