Published On : Mon, Jul 9th, 2018

रिलायन्स एनर्जीकडून कोटयावधीचा कर वसूल करुन दाखवा – छगन भुजबळ

Advertisement

नागपूर : राज्यातील अनेक गावांमध्ये वीज नाही…वीज गावागावात पोचवू असे आश्वासन सरकारने दिले…तर दुसरीकडे रिलायन्स एनर्जी कंपनीने दोन हजार कोटी रुपये कर थकवला आहे. दोन वर्षात एक रुपयाही दिला नाही. तरीही त्यांच्यावर कारवाई नाही. तरीही ते कंपनी विकायला निघाले आहेत. शेवटी हे जनतेचे पैसे आहेत.

त्यामुळे पाच लाख काय किंवा दहा लाख काय हे सरकार कर्ज होईपर्यंत वाट बघणार आहे का? सर्वसामान्यांकडून वीजबीले वसुल केले जातात परंतु या धनदांडग्याकडून वसूल केले जात नाही. त्यांच्याकडून वसूल करण्याची हिमंत राज्यातील नेत्यांकडे नाही. ती वरुनच केली जावू शकते असा टोला राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी लगावला.

पुरवणी मागण्यांवर आमदार छगन भुजबळ आज सभागृहात बोलत होते. आज ते नागपूरच्या पावसाळी अधिवेशनामध्ये दाखल झाले. पुरवणी मागण्यांवर बोलताना आमदार छगन भुजबळ सभागृहामध्ये पुन्हा एकदा आक्रमक रुपात पाहायला मिळाले. नाशिक येथून शेतकऱ्यांनी मोर्चा काढला.

यामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले होते. त्यांचे पाय रक्ताळे होते. वनहक्काच्या जमिनीसाठी ते आंदोलन होते. न्याय मिळावा अशी त्यांची मागणी होती. तुम्ही त्यांना एक आश्वासन देवून घरी पाठवले पण त्यावर काही केले नाही असा आरोपही छगन भुजबळ यांनी केला.

या सरकारने लोकांना फसवले, यांनी काय दिवे लावले ? एक लाख कोटी रुपयांच्या मागण्या आपण केल्या आहेत. सरकारने राज्याची आर्थिक स्थिती बिघडवली आहे असाही आरोप भुजबळ यांनी यावेळी केला. सरकारने राज्याला खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन दिले, टोलमुक्त करण्याचे आश्वासन दिले त्याचे काय झाले ? असा सवालही सरकारला छगन भुजबळ यांनी केला.