Published On : Mon, Oct 20th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात धनत्रयोदशीला तब्बल 1000 कोटींचा विक्रमी व्यापार; जीएसटी 2.0चा प्रभाव ठळक

नागपूर : ऑरेंज सिटी नागपुरात यंदाच्या धनत्रयोदशीला बाजारपेठांमध्ये चैतन्याची लाट उसळली होती. सोने–चांदीपासून वाहनं, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, बर्तन अशा सर्वच क्षेत्रात विक्रीची झळाळी दिसून आली. आकर्षक ऑफर्स आणि जीएसटीमधील सवलतींमुळे ग्राहकांनी उत्साहाने खरेदी केल्याने जिल्ह्यात तब्बल 1000 कोटी रुपयांहून अधिकचा व्यापार झाल्याची नोंद झाली आहे.

धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळच्या पहिल्या किरणापासूनच बाजारपेठा गजबजल्या. प्रत्येक गल्ली, चौक आणि शोरूममध्ये ग्राहकांची लगबग होती. सराफा बाजार, इलेक्ट्रॉनिक्स दुकाने, वाहन विक्री केंद्रे, तसेच वस्त्रदुकानांत ग्राहकांचा अक्षरशः मेळा भरला होता. कुणी नवी कार घेतली, कुणी दुचाकी तर कुणी घरासाठी फ्रिज, एलईडी टीव्ही किंवा वॉशिंग मशीनची खरेदी केली.

सोने–चांदीच्या दुकानांमध्ये मात्र दिवाळीचा आनंद अधिकच झळकत होता. उशिरापर्यंत ग्राहकांची गर्दी होती. सोने, चांदी, प्लॅटिनम आणि हिऱ्यांचे दागिने मोठ्या प्रमाणात विकले गेले. फक्त सराफा बाजारातच जवळपास १५० कोटी रुपयांचा व्यापार झाला. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरच्या आकर्षक सवलतींनी ग्राहकांना ओढले आणि टीव्ही, फ्रीज, मिक्सर, मायक्रोवेव्ह, एसी यांची विक्री विक्रमी झाली.

Gold Rate
18 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,28,500 /-
Gold 22 KT ₹ 1,19,500 /-
Silver/Kg ₹ 1,70,500/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

वाहन बाजारातही चांगलीच उलाढाल झाली. सुमारे ६ हजार दुचाकी आणि १२०० हून अधिक चारचाकी वाहनांची विक्री झाली. बर्तन बाजारातही पाय ठेवायलाही जागा नव्हती. लोकांनी पूजा थाळ्या, डिनर सेट्स आणि भेटवस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली.

एकूणच, या धनत्रयोदशीने नागपूरच्या अर्थव्यवस्थेत नवचैतन्य भरले असून, शहराने 1000 कोटींच्या व्यापाराचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
ऑरेंज सिटीमध्ये यंदा धन आणि समृद्धीची खरी उधळण पाहायला मिळाली.

Advertisement
Advertisement