वर्धा – सावंगी मेघे येथील शरद पवार दंत रुग्णालयाच्या कृत्रिम दंतशास्त्र विभागात कोविडपश्चात निर्माण झालेल्या म्युकोरमायकोसिसग्रस्त महिला रूग्णाचे दंतचिकित्सकांद्वारे पुनर्वसनात्मक उपचार करीत जबड्याची पुनर्मांडणी करण्यात आली.
कोविडनंतर उद्भवलेल्या म्युकोरमायकोसिस या आजारामुळे यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील रहिवासी कविता मालेकर (५१) यांचे संपूर्ण दात काढण्यात आले होते. त्यातच वरच्या जबड्याची झीज झाल्यामुळे रुग्णाला भोजन करताना त्रास होत होता आणि चेहऱ्याची ठेवणही बिघडलेली होती. रुग्णाला दंत रुग्णालयातील कृत्रिम दंतशास्त्र विभागात उपचारांसाठी दाखल केल्यानंतर दंतशल्यचिकित्सक डॉ. धनश्री मिनासे यांनी प्रारंभी शस्त्रक्रियेद्वारे झायगोमॅटिक इम्प्लांट रोपीत केले.
त्यानंतर या इम्प्लांटवर पक्क्या दातांचे आणि जबड्याचे शस्त्रकियेद्वारे रोपण करण्यात आले. तोंडातील तसेच जबड्याच्या उपलब्ध हाडांचा आधार घेऊन याप्रकारे रोपण केले जाते. दंतशल्यचिकित्सा उपचारात ही आधुनिक व नवीनतम पद्धती म्युकोरमायकोसिसच्या रुग्णांसाठी वरदान ठरली आहे.
या संपूर्ण शल्यचिकित्सा व उपचार प्रक्रियेत डॉ. धनश्री मिनासे यांना वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंजली बोरले, विभाग प्रमुख डॉ. सुरेखा गोडबोले, डॉ. सीमा साठे व शल्यचिकित्सक डॉ. भूषण मुंदडा यांचे मार्गदर्शन लाभले.
या उपचारांमुळे रुग्णाला पूर्वी खाद्यपदार्थ चावताना तसेच बोलताना निर्माण झालेल्या अडचणी दूर झाल्या आहेत. विशेष म्हणजे आजारातील प्राथमिक उपचाराने अंशतः विद्रूप झालेला चेहरा आता नीटनेटका झाला असून रुग्णाच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे, असे शरद पवार दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनोज चांडक यांनी सांगितले.