Published On : Fri, Jul 7th, 2017

विकासकामांसाठी खोदलेल्या जागांचे पुनर्भरण

Advertisement


नागपूर
: स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरातील मार्गावर रस्ते खोदलेले आहे. पावसाळ्यात या खोदलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. जे कार्य पूर्ण झाले आहे त्या ठिकाणचे रस्त्यांचे पुनर्भरण करून १५ दिवसांत पूर्ववत करा, असे निर्देश स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती संजय बंगाले यांनी अधिकाऱ्यांना दिले.

विकासकामांसाठी खोदलेल्या रस्त्यांचा दौरा मंगळवारी (ता. ११ जुलै) समिती सभापती आणि अधिकारी करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. मनपा मुख्यालयात शुक्रवारी (ता. ७ जुलै) झालेल्या स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीच्या बैठकीत हे निर्देश देण्यात आले. यावेळी प्रामुख्याने सभापती संजय बंगाले, उपसभापती अभय गोटेकर, समिती सदस्या सुषमा चौधरी, रश्मी धुर्वे, शेख मोहम्मद जमाल मोहम्मद इब्राहीम, सहायक आयुक्त (स्थानिक संस्था कर, कर आकारणी) मिलिंद मेश्राम, कार्यकारी अभियंता (हॉटमिक्स) राजेश भूतकर, कार्यकारी अभियंता (लोककर्म) दीपक सोनटक्के, कार्यकारी अभियंता (पेंच प्रकल्प) अनिरुद्ध चौगंजकर, कार्यकारी अभियंता के. एल. सोनकुसरे, उपअभियंता राजेश दुपारे (पेंच प्रकल्प) यांची उपस्थिती होती.

विकासकामांसाठी शहरात खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास होत आहे. आगामी पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून अपघात होण्याची शक्यता असते, असे समिती सदस्यांनी सांगितले. बैठकीत शहरातील विविध भागातील नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील समस्या मांडल्या. यावर, ज्या मार्गातील कामे पूर्ण झाली आहेत, त्या खोदलेल्या जागा, रस्ते १५ दिवसांत पूर्ववत करावे, असे निर्देश सभापतींनी दिले. सीसीटिव्ही कॅमेरे, व्हायफाय आदी विकासकामांसाठी चौकात लावलेल्या जंक्शन बॉक्सच्या जागांची पाहणीदेखिल करण्यात यावी, ज्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.