Published On : Sun, Feb 2nd, 2020

करदात्यांना दिलासा, उद्योगांना प्रोत्साहन : बावनकुळे

Advertisement

देशातील सर्वसामान्य करदात्यांना दिलासा देणारे व उद्योगांना प्रोत्साहन तसेच कृषी व सिंचनात वाढ होण्यासाठी चालना देणारे हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया माजी ऊर्जा मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.

पाच लाख रुपये उत्पन्न असणार्‍या सामान्य नागरिकाचे उत्पन्न करमुक्त केले असल्याबद्दल केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पाचे स्वागत करीत बावनकुळे यांनी म्हटले आहे की, महागाईवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न यातून झाला असून कृषी व सिंचनासाठी 2.83 लक्ष कोटींची तरतूद केल्यामुळे सिंचनाच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. स्वच्छ भारत अभियानासाठी 1200 कोटींची तरतूद आणि शिक्षणासासाठी 99 हजार कोटींची तरतूद केल्यामुळे शिक्षणाला प्रोत्साहन मिळणार आहे.

सन 2024 पर्यंत 6000 किमी महामार्गांची निर्मिती करून देशातील अनेक भाग जोडण्याचा प्रयत्न यातून होणार आहे. कृषी क्षेत्रासाठी 16 कलमी कार्यक्रम देऊन शेतकर्‍यांच्या कर्जासाठी 15 लाख कोटींची तरतूद करणे, शेती व ग्रामीण विकासासाठी 3 लाख कोटीची तरतूद करणे, शेतकर्‍यांच्या भाजीपाला, फळांसाठी किसान रेल म्हणजे शेतकरी धार्जिणे पाऊल आहे. अनु. जमातीसाठी विविध योजना राबविण्यासाठी 53 हजार कोटी आणि अनु. जातीच्या लाभार्थ्यांसाठी 85 हजार कोटींची तरतूद करून केंद्र शासनाने या दोन्ही वर्गांना दिलासा दिला आहे.

देशातील उद्योग, व्यापारी, सामान्य माणूस, शेतकरी, शेतमजूर, महिला, या सर्वांसाठी अंदाजपत्रकातून काहीना काही योजना आणून, कोणतीही करवाढ न करणारा व जीडीपी 10 टक्केपर्यंत नेण्याचा उद्देश म्हणजे अर्थव्यवस्थेला गती देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून झाल्याचेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.