नागपूर : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघात घेण्यात येणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणेने जय्यत तयारी पूर्ण केली आहे. ही लोकसभा निवडणूक अधिक पारदर्शक व शांततामय वातावरणात घेण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना पूर्ण करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.
नागपूर व रामटेक लोकसभेच्या निवडणुकीसाठी गुरुवार दिनांक 11 एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या मतदानाच्या प्रक्रियेसंदर्भात जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन निवडणूक यंत्रणेतर्फे करण्यात आलेल्या विविध व्यवस्थेसंदर्भातील माहिती दिली.
यावेळी अखिल भारतीय मानवता पक्षाच्या श्रीमती वनिता जितेंद्र राऊत, प्रो. डॉ.नथ्थुराम लोखंडे, ॲड. डॉ.सुरेश माने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी राजेश शर्मा, दीपक लक्ष्मणराव मस्के, संजय घोष, सुनील सुर्यभान कवाडे, भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी श्रीकांत भुई, जनअधिकार पक्षाचे प्रफुल्ल भांगे आदी उपस्थित होते.
लोकसभेसाठी घेण्यात येणाऱ्या मतदानासंदर्भात माहिती देतांना जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघातील सर्व मतदान केंद्रावर सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळात मतदानाची प्रक्रिया पारडण्यात येणार आहे. तत्पूर्वी सकाळी 6 वाजता विविध राजकीय पक्षांच्या पोलींग एजंटच्या उपस्थितीत मॉकपूलची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. यासाठी इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रावर 50 मत टाकून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात होईल.
कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अ लागू करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. निवडणूक नि:पक्ष निर्भय व न्यायवातावरणात सुरळीतपणे पार पाडणे आवश्यक असून कोणतीही अनूचित घटना घडू नये तसेच सार्वजनिक शांतता भंग होऊ नये म्हणून मतदाना केंद्राच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्यादृष्टीने आवश्यक उपाय योजण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात सहपोलिस आयुक्त रविंद्र कदम यांनी कलम 44 लागू करण्याचे आदेशही जारी केले आहे.
मतदानाच्या दिवशी म्हणजे 11 एप्रिल रोजी शहरातील कोणत्याही व्यक्तीस मतदान केंद्रामध्ये मतदान केंद्रापासून 100 मीटर अंतराच्या आतील कोणत्याही सार्वजनिक अथवा खाजगी जागेमध्ये प्रचार करता येणार नाही. अथवा मतासाठी अभियाचना करता येणार नाही. निवडणुकीच्यावेळी मत देण्याबद्दल मन वळवता येणार नाही. तसेच मतदानाकेंद्रामध्ये किंवा त्याच्या प्रवेशद्वाराजवळ अथवा आसपासच्या भागातील कोणत्याही सार्वजनिक अथवा खाजगी जागेमध्ये ध्वनीवर्धक किंवा ध्वनीक्षेप करणारे उपकरण वापरण्यास बंदी राहणार आहे. या परिसरात आरडाओरड किंवा बेशिस्तपणे वागता येणार नाही.
मतदानकेंद्रापासून 100 मीटर त्रिजेच्या परिसरात निवडणुकीच्या कामानिमित्त शासकीय वाहन वगळून इतर कोणतेही वाहन आणता येणार नाही. मतदान केंद्रावरील कामावर असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा येत असेल तर तो अपराध समजण्यात येईल. मतदारांना ने-आण करण्यासाठी अनधिकृतपणे वाहनाचा वापर करता येणार नाही असे केल्यास लोकप्रतिनिधी अधिनियमानुसार शिक्षेस पात्र राहील. मतदान केंद्रापासून 200 मीटर अंतराच्या परिसरात मंडप उभारण्यास तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधी व कार्यकर्त्यांना बसण्यासाठी टेबल व खुर्च्या लावण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात आले असल्याचेही अश्विन मुदगल यांनी स्पष्ट केले आहे.
लोकराज्यचा निवडणूक विशेषांक सर्वांसाठी मार्गदर्शक – मुदगल
मतदान करण्याची जनजागृती करण्याबरोबरच निवडणूक प्रक्रियेतील संबंधित विस्तृत माहिती असलेला लोकराज्यचा राष्ट्रीय महोत्सव मतदानासाठी महाराष्ट्र सज्ज हा लोकसभा निवडणूक विशेषांक उमेदवारासोबतच सर्वांसाठी मार्गदर्शक असल्याचे प्रतिपादन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या लोकराज्यच्या लोकसभा निवडणूक या विशेषांकाचे विमोचन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, रामटेक लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फडके, उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती राजलक्ष्मी शहा, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांच्या उपस्थितीत झाले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघातील मतदानासाठी प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या उपाययोजना आढावा घेण्यात आला. यावेळी लोकराज्य विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील मतदान प्रक्रियेसंदर्भातील विविधांगी माहिती लोकराज्यच्या विशेषांकाच्या माध्यमातून जनतेसाठी एकत्र उपलब्ध करुन देण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक अधिक पारदर्शक व शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे जय्यत तयारी केली आहे.
मतदान करण्याविषयी जनजागृती करण्याबरोबरच निवडणूक प्रक्रियेसंबंधी विविध गोष्टींची विस्तृत माहिती या अंकात देण्यात आली आहे. मतदार नोंदणी केलेली कोणतीही व्यक्ती मतदानापासून वंचित राहू नये यासाठी आयोगातर्फे विशेष प्रयत्न केले जात आहेत. यासाठी स्वीप मोहीम जिल्ह्यात व राज्यात यशस्वी राबविण्यात आली आहे. यासोबतच दिव्यांगांनाही आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विशेष सुविधा निर्माण केल्या आहेत.
समाज माध्यमाबाबत निवडणूक काळात घ्यावयाची खबरदारी, निवडणुकांचे बदलते तंत्र, निवडणुकीतील परिवर्तन यूग, निवडणूक खर्चांवर नियंत्रण आदी अभ्यासपूर्ण लेखांचा या अंकात समावेश करण्यात आला आहे. सुलभ संदर्भासाठी 2009, 2017 च्या निवडणुकीच्या आकडेवारीचा समावेश अभ्यासक व पत्रकारांना सुलभ संर्दभासाठी उपयुक्त ठरणार आहे.
प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी स्वागत करुन लोकराज्यच्या राष्ट्रीय महोत्सव मतदानासाठी महाराष्ट्र सज्ज या लोकसभा निवडणूक 2019 च्या विशेषांकाबद्दल माहिती दिली.
रामटेक लोकसभा मतदारसंघाची कळमना येथे मतमोजणी
भारत निवडणूक आयोगाने रामटेक लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी पंडित जवाहरलाल नेहरु मार्केट यार्ड, चिखली ले आऊट कळमना येथे करण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके यांनी दिली.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात लोकसभा मतदारसंघाचे मतदान गुरुवार दि. 11 एप्रिल रोजी होत असून, रामटेक लोकसभा मतदारसंघाचा त्यात समावेश आहे. मतमोजणी गुरुवार दि. 23 मे रोजी सकाळी 8 वाजता सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजाचा वापर करु नका- मुदगल
राष्ट्रीय सण तसेच महत्त्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजाचा वापर करु नका असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.
प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वज निर्मिती शासनाच्या 1 जानेवारी 2015 च्या शासन निर्णयानुसार पायबंद घालण्याच्या त्याचे उत्पादन, वितरण व विक्रेते यांच्यावर संबंधित विभागाने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. राष्ट्रध्वज कार्यक्रमानंतर मैदानात अथवा रस्त्यावर पडलेले असतात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. हे टाळण्यासाठी उच्च न्यायालयाने जनहित याचिकेवर निर्णय देताना प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वज वापरावर बंदीचा निर्णय दिला आहे. त्यामुळे येत्या 1 मे महाराष्ट्र दिनी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करुन नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.
राष्ट्रध्वजाचा अवमान होवू नये यादृष्टीने कार्यक्रम संपल्यानंतर ठीक-ठिकानी राष्ट्रध्वज गोळा करुन त्याची योग्य विल्हेवाट लावण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. खराब झालेले राष्ट्रध्वज पिशवी किंवा कापडामध्ये व्यवस्थित बांधून सूर्यास्तानंतर व सूर्योदयापूर्वी जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली नष्ट करण्यात यावे. व तसे करताना सर्वांनी उभे राहावे व ते पूर्णपणे जाळून नष्ट होईपर्यंत कोणीही जागा सोडू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.
रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करण्याकरिता जिल्ह्यातील सामाजिक संघटना, नागरिक, विद्यार्थी यांनी सहकार्य करावे व जमा करण्यात आलेले राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी किंवा संबंधित तहसील कार्यालयात सुपूर्द करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी जनतेला केले आहे.