Published On : Fri, Oct 13th, 2017

अनुभवविश्व समृध्द करण्यासाठी वाचन आवश्यक – ग्रंथपाल विभा डांगे

नागपूर: आपले अनुभवविश्व समृध्द करण्यासाठी तसेच माहिती पासून ज्ञानापर्यंत पोहोचण्यासाठी वाचनसंस्कृती अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. वाचनाने केवळ ज्ञानातच भर पडत नाही तर खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्त्व विकास होतो. त्यातून आत्मविश्वास निर्माण होऊन सभा धारिष्टय निर्माण होते. यासाठी अभ्यासासोबतच अवांतर वाचनावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा, असे आवाहन विभागीय ग्रंथालयाच्या ग्रंथपाल विभा डांगे यांनी आज केले.
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस 15 ऑक्टोंबर हा ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर सीताबर्डी येथील विभागीय माहिती केंद्र येथे ‘वाचन प्रेरणा दिन’ आयोजित करण्यात आला. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर विभागाचे संचालक राधाकृष्ण मुळी, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, विभागीय माहिती केंद्राचे जिल्हा माहिती अधिकारी केशव करंदीकर उपस्थित होते.

ग्रंथपाल विभा डांगे म्हणाल्या की, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे बालपण अतिशय कष्टात गेले. परंतु त्यांनी आयुष्यात केवळ आपल्या ध्येयाप्रती लक्ष केंद्रित केले. आयुष्यातील उणीवा त्यांनी नगण्य मानल्या. त्यांच्या बालपणी त्यांच्या वडीलांचे निधन झाले. भावाची शिक्षणाची तळमळ बघून त्यांच्या बहिणीने स्वत:चे दागिने विकून त्यांना शिक्षण दिले. अशा विपरित परिस्थितीत देखील त्यांनी आपला व्यासंग कायम राखला. आयुष्यात सर्वोच्च पदावर गेल्यानंतर देखील त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद ठेवला. त्यांनी वाचनाचे महत्त्व सांगितले. त्यांची ग्रंथसंपदा विपुल आहे. त्यांच्या पासून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, यासाठी त्यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. विद्यार्थ्यांनी केवळ निर्धारित पुस्तकांचेच वाचन न करता संदर्भिय ग्रंथाचे अवलोकन करावे. अवांतर वाचनामुळे व्यक्ती बहुश्रूत होते. वाचनामुळे मिळणाऱ्या ज्ञानामुळे व्यक्तीमधे आत्मविश्वास निर्माण होतो, असेही डांगे यावेळी म्हणाल्या.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संचालक राधाकृष्ण मुळी म्हणाले की, आज सर्वत्र माहितीचे स्त्रोत अनेक माध्यमातून वाचकांपुढे उपलब्ध होत आहे. इंटरनेट व सोशल मीडियावर नवनवीन माहितीचे दालन खुले होत आहे. माहितीची विश्वासार्हता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. वाचन म्हणजे पुस्तकांचे वाचन हा अर्थ अभिप्रेत आहे. वाचनांमुळे आपली भाषा तर सुधारते. त्याचप्रमाणे आपल्या अनुभव विश्वाचा विस्तार देखील होत जातो. यातून आपले व्यक्तीमत्त्व वृध्दिंगत होत जाते. वाचनामुळे वस्तूनिष्ठ ज्ञान आणि विश्लेषणाची वृत्ती वाढीस लागते. वाचनाची गरज ही केवळ अभ्यासापुरती मर्यादित नसावी. वाचनाच्या माध्यमातून आपल्या व्यक्तीमत्त्वाचा विकास व्हायला हवा. वाचनाची सुरुवात आवडीच्या विषयापासून करावी.

जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर म्हणाले की, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी केलेले कार्य हे प्रदेश, देश यांच्या सीमेत अडकले नाही. विज्ञान क्षेत्रामध्ये त्यांनी केलेले कार्य अलौकिक आहे.

त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचा मूलमंत्र दिला. आयुष्यभर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतांनाच त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. कलाम यांचे जीवन अत्यंत संघर्षमय होते. तरी देखील त्यांनी कठीण परिस्थितीत देखील आपले ध्येर्य गाठण्यासाठी अविरत प्रयत्न चालू ठेवले. त्या प्रयत्नाच्या माध्यमातूनच त्यांनी केलेल्या उत्तुंग कार्याची दखल जगाने घेतली. यासाठी आज सर्वांनी ‘वाचन प्रेरणा दिना’निमित्त दररोज अवांतर प्रेरणादायी वाचन करण्याचा प्रण प्रत्येकाने घ्यावा, असे आवाहन श्री. गडेकर यांनी केले.

वाचन प्रेरणा दिनानिमित्त विभागीय माहिती केंद्रामध्ये ‘लोकराज्य’ या मासिकांचे प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. यामध्ये नविन अंकासह दुर्मिळ लोकराज्य अंकाचा समावेश होता. या प्रदर्शनामध्ये नोव्हेंबर 1964 पासूनचे अत्यंत दुर्मिळ तसेच विविध विषयाला वाहिलेले लोकराज्य वाचकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले. सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन जिल्हा माहिती अधिकारी केशव करंदीकर यांनी केले.