Published On : Tue, Mar 31st, 2020

अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना आजपासून तीन महिन्याचे धान्य – रविंद्र ठाकरे

Advertisement

· प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रत्येकी 5 किलो धान्य

· प्रत्येक दुकानासमोर तक्रारपेटी

नागपूर : कोरोनाच्या प्रार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या काळात गरीब व गरजू कुटुंबांना तीन महिन्याचा धान्य पुरवठा करण्याच्या शासनाच्या निर्णयानुसार बुधवार, दिनांक 1 एप्रिलपासून शिधापत्रिकाधारकांना स्वस्तधान्य दुकानामार्फत धान्याचे वाटप सुरु होत आहे. यामध्ये अंत्योदय कार्डधारकांना 15 किलो गहू व 20 किलो तांदूळ अशी एकूण 35 किलो याप्रमाणे तीन महिन्याचे एकत्र धान्याचे वाटप सुरु करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली.

शिधापत्रिकाधारकांना वाटप करायचा धान्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ जिल्हयातील 1 लाख 23 हजार अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना होणार आहे. यामध्ये शहरातील 46 हजार तर ग्रामीण भागातील 77 हजार शिधापत्रिकाधारकांचा समावेश आहे. 2 रुपये किलोने गहू तर 3 रुपये किलोने तांदूळ सुध्दा उपलब्ध होईल. यासोबत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रत्येकी 5 किलो याप्रमाणे धान्य वितरीत करण्यात येणार असून यामध्ये 2 किलो गहू तर 3 किलो तांदूळचा समावेश आहे.

शिधापत्रिका नसलेल्या व अंत्यत गरजू नागरिकांना स्वस्त धान्य दुकानामार्फत धान्य पुरवठा करण्यात येणार असून यासाठी शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबांची माहिती एकत्र करण्याच्या दृष्टीने स्वस्त धान्य दुकानांमध्ये तक्रारपेटी ठेवण्यात येणार आहे. शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबांनी आधारकार्ड, कुटुंबातील व्यक्तींची संख्या, पत्ता आदी माहिती या तक्रारपेटीत टाकणे आवश्यक आहे. त्यानुसार अशा कुटुंबांना धान्य वितरणासंदर्भात निर्णय घेणे सूलभ होणार असल्याचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

अत्यावश्यक साहित्य असलेल्या किटचे वितरण
संचारबंदीच्या काळात समाजातील गरीब व गरजू नागरिकांना स्वस्त धान्य दुकानामार्फत धान्य वितरणासोबतच साखर, तेल, दाळ, साबन, कांदे, बटाटे, रवा, पोहे, बेसन आदी साहित्य असलेली किट जिल्हा प्रशासनातर्फे तयार करण्यात आली आहे. यासाठी उद्योगांचा सामाजिक उत्तर दायित्त्व निधी (सीएसआर फंड) तसेच विविध संस्था, सामाजिक संस्था, व्यक्ती आदींनी दिलेल्या निधीमधून खर्च करण्यात येणार आहे. ज्या गरीबांचा रोजगार तसेच कामधंदा बंद आहे. अशा नागरिकांना ही किट देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली.

पिठ गिरण्या सुरु राहणार
संचारबंदीच्या काळात जिल्हयातील व शहरातील सर्व पिठ गिरण्या सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आज दिली. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूसोबत पिठ गिरण्यासुध्दा सुरु ठेवणे आवश्यक असल्यामुळे सुट देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठीचे नियोजन करता यावे तसेच शेतीसाठी आवश्यक असलेले बी बियाणे व खतांचा पुरवठा वेळेवर होण्याच्या दृष्टीने कृषी सेवा केंद्रसुध्दा सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रक्तदान शिबीराचे आयोजन
थॉलेसिमिया आजार असलेल्या रुग्णांना तसेच इतर रुग्णांना रक्ताचा पुरवठा नियमित होण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन व ब्लड बँकांच्या सहकार्याने शहराच्या विविध भागात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. आतापर्यंत 394 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.

रक्तदान शिबीर शहराच्या विविध भागात आयोजित करण्यात येत असून कोरोना विषाणूच्या प्रार्श्वभूमीवर एकाच ठिकाणी गर्दी होवू नये यादृष्टीने शहराच्या विविध भागात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच खाजगी रक्तपेढ्यांचे सहकार्य घेण्यात येत आहे. रक्तदात्यांनी रक्तदान करण्यासाठी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, तसेच रक्तदान करायचे असल्यास जिल्हा प्रशासनाचे नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक 2562668 यावर संपर्क साधाल्यास रक्तपेढीतर्फे संबंधित विभागात रक्त घेण्याची व्यवस्था करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी हरिभाऊ नाईक

यांनी दिले महिन्याचे निवृत्तीवेतन
कामगार नेते व माजी आमदार हरिभाऊ नाईक यांनी कोरोनाग्रस्तांच्या सहाय्यतासाठी एक महिन्याचे निवृत्तीवेतन 52 हजार रुपयाचा धनादेश जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांना दिला.

कोरोना विषाणूमुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री निधीस सढळहस्ते मदत करण्याचे आवाहन केले होते. माजी आमदार व कामगार नेते हरिभाऊ नाईक यांनी एक महिन्याचे निवृत्तीवेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले आहे.

माजी आमदार द्वारकाबाई गावंडे यांची मदत
माजी आमदार द्वारकाबाई गावंडे यांचे एक महिन्याचे निवृत्तीवेतन 40 हजार रुपयाचा धनादेश जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांना जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष श्रीमती सुनिता गावंडे यांनी दिला.