Published On : Wed, Sep 9th, 2026
By Nagpur Today Nagpur News

जरांगे यांचा उपयोग संपला, सरकारला त्यांना मारायचेय; नागपुरात संजय राऊतांचा गंभीर आरोप

Advertisement

जरांगे यांचा उपयोग संपला, सरकारला त्यांना मारायचेय; नागपुरात संजय राऊतांचा गंभीर आरोप

नागपूर : मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ‘मनोज जरांगे यांचा आता सरकारला उपयोग राहिलेला नाही. त्यांचा संघर्ष आता सरकारच्या गळ्याचा फास बनला असून, सरकारला त्यांना मारायचे आहे,’ असा खळबळजनक दावा राऊत यांनी केला.

जरांगे यांच्या प्रकृतीची माहिती चिंताजनक असल्याचे सांगत राऊत यांनी सरकारच्या प्रमुखांनी त्यांच्याशी तातडीने चर्चा करावी, अशी मागणी केली. मराठा किंवा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न असो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून या प्रश्नावर तोडगा काढावा, असेही त्यांनी म्हटले.

Gold Rate
Sept 09,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,35,700/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

धनुष्यबाण बाळासाहेबांच्या शिवसेनेचेच-
शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरही राऊत यांनी आक्रमक भूमिका मांडली. धनुष्यबाण हे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे पारंपरिक चिन्ह असून, कारस्थान करून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून हे चिन्ह चोरले गेले, असा आरोप त्यांनी केला. या संपूर्ण प्रक्रियेच्या मागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असल्याचा दावाही राऊत यांनी केला.

‘चोरीच्या प्रकरणात पोलिस मुद्देमाल जप्त करतात. त्यामुळे धनुष्यबाणाचे चिन्हही चोरांच्या हातात देऊ नये,’ असे राऊत म्हणाले. शिंदे गटाचे वकील केवळ वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत धनुष्यबाणाच्या प्रकरणाची दररोज सुनावणी घेऊन तातडीने निकाल द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

Advertisement

अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे स्वागत-
मुस्लिम महिलांना गरब्यात सहभागी होऊ द्यावे, या अमृता फडणवीस यांच्या भूमिकेचे राऊत यांनी स्वागत केले. मात्र, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील कथित नवहिंदुत्ववादी नेत्यांचेही ‘समुपदेशन’ करावे, असा टोला लगावला.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मुस्लिम समाजाचे मोठे योगदान असल्याचे सांगत राऊत यांनी नवरात्रातील दांडिया हा लोकसहभागाचा उत्सव असल्याचे म्हटले.

नार्वेकरांनी पक्षांतरबंदी कायद्यावर बोलू नये-
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पक्षांतरबंदी कायद्यावरील वक्तव्यावरही राऊत यांनी टीका केली. पक्षांतरबंदी कायद्याबाबत नार्वेकरांची भाषा या कायद्याचा अपमान करणारी असल्याचे ते म्हणाले.

राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर राऊतांचे भाष्य-
रोहित पवार योग्य बोलत असल्याचे सांगत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत असल्याचे राऊत म्हणाले. भाजपसोबत जाण्याचा निर्णय अजित पवार यांनी मजबुरीतून घेतल्याचा दावा त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस हा शरद पवार यांचाच पक्ष असल्याचे सांगत शरद पवार कधीही भाजपसोबत जाणार नाहीत, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.

प्यारे खान-अबू सालेम भेटीवर सरकारला सवाल-
राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अबू सालेमची कारागृहात भेट घेतल्याच्या मुद्द्यावरूनही राऊत यांनी सरकारला घेरले. प्यारे खान यांची नियुक्ती याच सरकारने केली असल्याने या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

शिंदेंच्या पुरस्कारावर टोला-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळणाऱ्या पुरस्कारावर भाष्य करताना राऊत यांनी उपरोधिक टीका केली. ‘भवानी तलवार घेऊन लंडनला या,’ असे आव्हान देत त्यांनी या पुरस्काराच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला.

कर्नाटकातील ईडी कारवाईवरही सवाल-
कर्नाटकातील काँग्रेस मंत्र्यांवरील ईडीच्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी महाराष्ट्रातील कथित घोटाळ्यांचा मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्रात आणि राम मंदिर ट्रस्टमध्ये घोटाळे झाले, तेव्हा ईडी कुठे होती, असा सवाल त्यांनी केला.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.