नागपूर: प्रेमाच्या जाळ्यात अडकवून नऊ महिन्यांपासून अल्पवयीन मुलीसोबत तरुणाने अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तरुणाला अटक केली. ही घटना कोराडी पोलीस ठाण्यांतर्गत घडली. कृष्णा झनकलाल मच्छिरके (२६) रा. कोराडी, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
माहितीनुसार, आरोपी कृष्णाने जून २०२३ मध्ये १५ वर्षीय मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळयात ओढले. दोघेही एकाच वस्तीत राहायचे घरी एकटा असताना त्याने मुलीला भेटण्यासाठी बोलावले. तेथे तिच्याशी अश्लील चाळे सुरू केले. तिने विरोध केला असता लग्नाचे आश्वासन दिले. त्यानंतर तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले. तेव्हापासून तो सतत मुलीचे लैंगिक शोषण करीत होता. याबाबत मुलीच्या कुटुंबीयांना समजले. मुलीसह पोलीस स्टेशन गाठून कृष्णा विरुद्ध तक्रार करण्यात आली.
पोलिसांनी लैंगिक अत्याचार आणि पोक्सो अॅक्टच्या कलमान्वये गुन्हा नोंदवून कृष्णाला अटक करत तपास सुरु केला आहे.