Published On : Tue, May 8th, 2018

काँग्रेसचे वरिष्ठ नेते रणजित देशमुख यांची मुलाविरुद्ध ‘मानसिक छळवणुकीची’ तक्रार !

नागपूर – काँग्रेसचे वरिष्ठ नेते रणजित देशमुख यांनी आपल्या मुलाविरुद्ध मानसिक छळवणूक केल्याची तक्रार सीताबर्डी पोलिसांत दिली आहे. देशमुख हे सध्या वयाच्या सत्तरीत असून पार्किन्सन आजाराने ग्रस्त आहेत.

आपल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की त्यांच्या दोन मुलांपैकी एकाने त्यांच्या घराच्या एका भागावर अवैध कब्जा केला आहे वारंवार सूचना देऊनही हा भाग खाली करना तो तयार नाही. घराच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या मजल्यावर मुलाने कब्जा केल्याचे त्यांनी सांगितले. देशमुख व त्यांच्या मुलामध्ये हा घरगुती वाद मागील काही वर्षांपासून सुरू असून तो आता चव्हाट्यावर आला आहे.

दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी अद्याप काहीही कारवाई केली नाही. आपल्या मुलाने घराचे कुलूप तोडून कथित भागावर कब्जा केल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे. त्याने या भागावर कब्जा करू नये यासाठी खासगी सुरक्षारक्षक देखील तैनात केल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे. परंतु तरीसुद्धा मुलाने जबरदस्तीने घरात प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणी देशमुख यांची तक्रार प्राप्त झाल्याचे सीताबर्डी पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत खराबे यांनी सांगितले. हा घरगुती वाद असून पोलीस नियमाप्रमाणे कारवाई करतील असे ते म्हणाले. देशमुख यांच्या जीवाला कोणाकडूनही धोका नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.