
डोक्यावर नेतेपदाची टोपी, पण अधिकारांची पाटी कोरी, अशी अवस्था झाल्यानं नारायण राणे काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा वर्षभरापासून सुरू आहेत. महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांनंतर त्यांची अस्वस्थता अधिकच वाढल्याचंही बोललं जात होतं. त्या पाठोपाठ, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या कार्यपद्धतीला ते कंटाळलेत आणि भाजपच्या वाटेवर आहेत, अशी हवाही गेल्या महिन्यात झाली होती. पण, राणेंनी या चर्चा फेटाळल्या होत्या. ५ एप्रिलला त्यांनी दिल्लीला जाऊन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेटही घेतली होती आणि आपण काँग्रेसमध्ये समाधानी असल्याचं स्पष्ट केलं होतं. मी कुठल्याही पक्षात जाणार नाही, असं सांगून त्यांनी या विषयावर पडदा पाडला होता.
मात्र, या पडद्यामागे काहीतरी वेगळंच सुरू असल्याचं बुधवारी उघड झालं. देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांची काल अहमदाबादमध्ये तासभर बैठक झाल्याची बातमी सूत्रांकडून कळली होती. ते नेमके कशासाठी भेटले, हे काही कळू शकलं नव्हतं. पण, थोड्या वेळाने नारायण राणे प्रसारमाध्यमांना अहमदाबाद विमानतळावर दिसले आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. राणे मुंबईला यायला निघाले होते, याचा अर्थ देवेंद्र – अमित शहा यांच्या भेटीदरम्यान तेही अहमदाबादमध्येच होते. हे सगळे धागे जोडल्यानंतर, महाराष्ट्राची राजकीय समीकरणं गुजरातमध्ये मांडली जात असल्याचं जाणकारांनी हेरलं. प्रसारमाध्यमांनी राणेंशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मौन बाळगणंच पसंत केलं. ते मौनही बरंच काही सांगून जाणारं आहे, असं राजकीय विश्लेषकांना वाटतंय.










