Published On : Mon, Mar 25th, 2019

रामटेकमध्ये काँग्रेसमधून अर्ज दाखल करण्यासाठी पोहचले दोन उमेदवार-किशोर गजभिये आणि नितीन राऊत

रामटेक : लोकसभा निवडणूक २०१९ च्या महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. याच निमित्तानं काँग्रेसमधला गोंधळ समोर आलाय. रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे दोन-दोन उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी दाखल झाले आहेत. काँग्रेस नेते किशोर गजभिये आणि नितीन राऊत हे दोन्ही नेते आपापल्या कार्यकर्त्यांसह उमेदवारी दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालेत.

आज सकाळी रामटेकमधून काँग्रेसच्यावतीने किशोर गजभिये यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र थोड्याच वेळापूर्वी काँग्रेस नेते नितीन राऊत हे रामटेक लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल करायला पोहोचलेत. काँग्रेसचा अधिकृत उमेदवारीचा एबी फॉर्म मिळाल्याचं सांगत आपणच रामटेकमधून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असल्याचं ठासून सांगितलंय. त्यांच्यासोबत काँग्रेस आमदार सुनील केदार हेदेखील उपस्थित आहेत. अर्ज दाखल करण्याचे आदेश आपल्याला पक्षाकडून ‘फॅक्स’द्वारे देण्यात आल्याचा दावा राऊत समर्थकांनी केलाय.

नितीन राऊत हे राज्याचे माजी मंत्री व काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यामुळे, रामटेकमध्ये काँग्रेस उमेदवार बदलत आहे की नितीन राऊत बंडखोरी करत आहे, हे काही वेळातच स्पष्ट होईल.