Published On : Mon, Aug 23rd, 2021

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या राजू कावळे यांच्या पत्नीने बांधली देवेंद्र फडणवीसांना राखी

नागपूर : नागपुरातील सामाजिक कार्यकर्ते दिवंगत राजू कावळे यांचे काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कावळे कुटुंबीयांची रविवारी (ता. २१) त्यांच्या राहत्या घरी भेट घेतली. कावळे यांच्या पत्नीने श्री. फडणवीस यांना राखी बांधून भावनिक त्यांच्यावरील विश्वास व्यक्त केला.

दिवंगत राजू कावळे यांचे कुटुंबीय शनिवारी परिसरात राहतात. ते प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते होते. कोरोना काळात त्यांनी केलेले कार्य वाखाणण्याजोगे होते. मात्र, परोपकार करताना त्यांनाच कोरोनाने ग्रासले. कोरोनाग्रस्त राजू कावळे यांनी मृत्यूशी झुंज दिली. मात्र, कोरोनामुळे अखेर त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर आज रविवारी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत आपण एकटे नाहीत.

भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता भाऊ या नात्याने आपल्या सोबत असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी राजू कावळे यांच्या पत्नीला दिला. त्यांनी यावेळी फडणवीस यांना राखी बांधून आशीर्वाद घेतले. यावेळी नगरसेवक प्रमोद चिखले, लता काडगाये, विजय चुटेले, महामंत्री भवंजीभाई पटेल, सूरज बांते, प्रवीण भगत, राजेश जाधव, संदीप माने, अक्षय कावळे, भोंगाडे उपस्थित होते.