Published On : Mon, Aug 21st, 2017

सत्यवचनी रामाचे भक्त नरेंद्र मोदी असत्यवचनी कसे?; राजू शेट्टींचा सवाल

नागपूर: राष्ट्रीय लोकशाही आघाडीपासून (रालोआ) फारकत घेण्याच्या तयारीत असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. ते रविवारी नागपूरच्या निमखेडा येथे आयोजित घेण्यात आलेल्या पाणी परिषदेत बोलेत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्ती न झाल्याच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर चांगलीच आगपाखड केली. राम सत्यवचनी होता, मग त्याचे भक्त नरेंद्र मोदी असत्यवचनी कसे, याचे उत्तर रेशीम बागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने द्यावे, अशी खोचक टीकाही यावेळी शेट्टी यांनी केली.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही लक्ष्य केले. मध्य प्रदेश सरकारने बालाघाट जिल्ह्यात चौराई धरण बांधल्याने तोतलाडोह आणि पेंच प्रकल्पातील जलसाठा घटला आहे. परिणाम नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे तब्बल २ लाख ६० हेक्टर क्षेत्रातील पेरणी खोळंबली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. याशिवाय, नागपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातील मोठे मंत्री नितीन गडकरी सोडवू शकले नाहीत, याचे मला आश्चर्य वाटत असल्याचे सांगत त्यांनी महायुतीच्या नेत्यांना घरचा आहेर दिला.

देशभक्ती, संस्कृती, विचार सांगणारे भाजपच शेतकऱ्यांवर अन्याय करीत असेल तर हे कितपत योग्य आहे. मोदी यांनी लोकसभा निवडणूक काळात आश्वासने दिली. मोदी हे रामभक्त आहेत. श्रीराम एकवचनी राहिले. म्हणून मोदी यांनीही वचन पाळायला हवे, असे राजू शेट्टी यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांवरील हा अन्याय रेशीमबागला दिसत नाही काय, असा रोकडा सवालही त्यांनी संघाच्या नेत्यांना विचारला.

काही दिवसांपूर्वीच शेट्टी यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले होते. जोपर्यंत शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा होत नाही, तोपर्यंत सरकारचा पिच्छा आम्ही सोडणार नाही. सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही. तीन वर्षांपूर्वी सरकारने दिलेले आश्वासन सरकारने पूर्ण केले असते, तर शेतकरी कर्जबाजारी झाले नसते. म्हणून आधी शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, अन्यथा मुख्यमंत्र्यांना दिवाळी साजरी करू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला होता. या सगळ्या घडामोडींनंतर त्यांनी ‘रालोआ’तून बाहेर पडण्याचे संकेतही दिले होते.