नागपूर: राजकमल चौकाजवळील देसी दारू भट्टीसमोर उशिरा रात्री घडलेल्या खुनाची घटना नागपूरमध्ये खळबळ उडवणारी ठरली. विशाल बनसोडे (३२) याचा निर्दय खून करण्यात आला असून किरकोळ वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अजनी पोलिसांची धडाकेबाज कारवाई-
घटना घडल्यानंतर आरोपी विरजी बालाजी कवेटीया (३७) हा पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, अजनी पोलिसांनी तात्काळ सर्व बाजूंनी नाकाबंदी करून अवघ्या काही मिनिटांत त्याला पकडले. पोलिसांच्या या तत्पर आणि प्रभावी कारवाईचे नागरिकांकडून जोरदार कौतुक केले जात आहे.
घटनास्थळी पोलिसांची धाव-
हत्येची माहिती मिळताच अजनी पोलीस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. परिसराची पूर्ण घेराबंदी करण्यात आली. चारही दिशांनी नाकाबंदी असल्याने आरोपीला पळ काढता आला नाही आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे जप्त केले असून आरोपीची कसून चौकशी सुरू आहे.
स्थानिकांचा पोलिसांना सलाम-
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, पोलिसांनी त्वरित कारवाई केली नसती तर आरोपी फरार होऊ शकला असता. या जलद आणि नेमक्या प्रतिसादामुळे अजनी पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की, शहरात गुन्हेगारांना मुक्तपणे फिरू दिले जाणार नाही.
तपास सुरू-
विवादाचे खरे कारण, खुनामागील पार्श्वभूमी आणि इतर संबंधित पैलूंचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.ही घटना नागपूर पोलिसांची दक्षता आणि शहराच्या सुरक्षेबाबतची त्यांच्या कटिबद्धतेची पुन्हा एकदा जाण करून देते.









