Published On : Sat, Aug 19th, 2017

विदर्भात पावसाचं पुनरागमन; आजही मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

नागपूर: विदर्भाच्या काही भागात शुक्रवारी रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. तसंच रविवारीसुद्धा विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. नागपूर शहरात शुक्रवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. शुक्रवारी रात्री तीन तासात 141.9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आजही विदर्भात सर्वत्र मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. भंडाऱ्यातही पावसाने चांगली हजेरी लावली आहे. गेल्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बुलढाणा जिल्ह्यात शनिवारी सकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय.

गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. त्यामुळे पावसामुळे सर्वसामान्य नागरिकही सुखावला आहे. अजून काही दिवस असाच पाऊस पडला तर बळीराजाच्या चिंता दूर होतील.

उत्तरेकडच्या राज्यांमध्ये पावसामुळे हाहाकार उडाला आहे. पण याच पावसाने महाराष्ट्रात काही दिवसांपासून पाठ फिरवली होती. त्यामुळे महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाडा दुष्काळाच्या उंबरठयावर असल्याचं पाहायला मिळतं होत. पण शुक्रवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने विदर्भाला काही प्रमाणात दिलासा दिला आहे. .


मराठवाडयातही मागच्या काही दिवसात पावसाचा एक थेंबही पडलेला नाही. येणा-या दिवसांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला नाही तर, या भागात भीषण दुष्काळी परिस्थिती उदभवू शकते. दोनवर्षांपूर्वी मराठवाडयाने अशा भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना केला होता.

दुष्काळ जाहीर करा
मराठवाड्यात गेल्या दीड महिन्यात पावसाचा थेंब पडलेला नाही. खरीप पिके संकटात आहेत. दररोज दोन शेतकरी आत्महत्या करीत आहेत. तरुण मुले आणि मुलींमध्येही आत्महत्येचे लोण पसरले असतानाही राज्यकर्ते हातावर हात ठेवून बसले आहेत, याकडे लक्ष वेधत मराठवाड्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा, अशी आग्रही मागणी विरोधकांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली.

लातूर विभागातील ४८ तालुक्यांपैकी १५ तालुक्यांत २५ ते ५० टक्के, तर २२ तालुक्यांत ५० ते ७५ टक्केच पाऊस झाला आहे. येथील २७.१५ लाख हेक्टरवर (१०० टक्के) पेरणीची कामे उरकली आहेत. लातूर, अहमदपूर, औसा, निलंगा, रेणापूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परंडा, कळंब, नांदेड जिल्ह्यासह देगलूर व हिमायतनगर, परभणीतील गंगाखेड, पाथरी, पालम, जिंतूर व पूर्णा आणि हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनूरी तालुक्यातील पिके सुकू लागली आहेत.