नागपूर : महापालिकेने उपद्रवी शोध पथकाच्या माध्यमातून सार्वजानिक ठिकाणी किंवा रस्त्यांवर थुकणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईतून महानगर पालिकेने ७ लाख ८२ हजार ४०० रुपयांची कमाई केली आहे. मागील पाच वर्षांत पालिकेने ४ हजार ५७८ लोकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
सर्वात जास्त थुंकणाऱ्या व्यक्तींची संख्या ही शहरातील सुशिक्षित भाग असलेल्या लक्ष्मीनगर व धरमपेठ झोनमध्ये आहे. पाच वर्षांत शहरातील विविध भागांत ४ हजार ५७८ लोकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ७ लाख ८२ हजार ४०० रुपये दंड करून महापालिकेने कमाई केली. विशेष म्हणजे, झोननिहाय माहिती घेतली असता त्यात शहरातील सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या लक्ष्मीनगर झोनमध्ये १ हजार ७ लोकांवर कारवाई करून १ लाख ८२ हजार ८०० रुपये दंड आकारण्यात आला आहे.
नागपुरात कोरोनाने थैमान घातले होते त्यादरम्यान सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास प्रतिबंध घालण्यात आले होते. त्यादरम्यान महापालिकेने कडक कारवाईची मोहीम हाती घेतली होती . त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले होते. मात्र पुन्हा गेल्या वर्षभरात या संख्येत वाढ झाली असल्याने महापालिकेने ही मोहीम सुरु केली आहे.