Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Jul 19th, 2018

  ‘जिल्हे नागपूर’ पुस्तिकेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

  नागपूर: नागपूर जिल्ह्याच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक माहितीसह समृद्ध परंपरेच्या वाटचालीचा तसेच विकासाची संपूर्ण माहिती असलेल्या जिल्हा माहिती कार्यालयाने शब्दबद्ध केलेल्या ‘जिल्हे नागपूर’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

  विधान भवनातील मंत्री परिषद सभागृहात ‘जिल्हे नागपूर’ पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

  यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, डॉ. मिलींद माने, सुधीर पारवे, डी. मल्लिकार्जुन रेड्डी, डॉ. आशिष देशमुख, सुनील केदार, समीर मेघे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी तसेच विविध विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, विभागीय आयुक्त अनूप कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंह,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी संजय यादव, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी उपस्थित होते.

  पायाभूत सुविधांच्या माध्यमातून नागपूरकरांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करणे हा उद्देश राखून जिल्ह्याच्या इतिहास, संस्कृती, भाषा, साहित्य, क्रीडा अशा विविध घटकांद्वारे जिल्ह्याला समृद्ध बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शासन योजनांची फलश्रुती ही समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचणे असते. यामध्ये नागपूर जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असलेल्या नागपूर जिल्ह्याचा नियोजनबद्ध विकासाची कास धरणे शक्य झाले आहे. याच विकासात्मक कार्याची माहिती ‘जिल्हे नागपूर’ या पुस्तकातून प्रत्येकाला वाचायला मिळणार असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

  देशातील ‘एज्युकेशन हब’ म्हणून तयार होत असलेली नवनवीन शैक्षणिक आणि रोजगाराची दालने, आधुनिक वैद्यकीय सुविधांची निर्मिती, पर्यटन विकास, ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी, वंचितांच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेले विविध योजना व उपक्रम, कौशल्य विकासातून स्वयंपूर्णतेकडे मार्गक्रमण करणाऱ्या नागपूर जिल्ह्याच्या प्रत्येक घटकाचा आणि विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून लाभान्वित झालेल्या प्रत्येक समाजाची कहाणी सांगणारी ही माहिती पुस्तिका आहे. ऐतिहासिक वारसा जपताना कृषि, उद्योग क्षेत्रातही नागपूर जिल्ह्याने उंच भरारी घेतली आहे. इतिहास ते नियोजनबद्ध विकासाच्या प्रत्येक क्षणाला शब्दबद्ध करणारी ही पुस्तिका आहे.

  प्रारंभी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी ‘जिल्हे नागपूर’ या उपक्रमाविषयी माहिती दिली. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या संकल्पनेतून तसेच नागपूर-अमरावती विभागाचे संचालक राधाकृष्ण मुळी यांच्या मार्गदर्शनात या पुस्तकाची निर्मिती जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी केली आहे. 84 पानाच्या या पुस्तकात जिल्ह्यातील इतिहास, कला, संस्कृती आदी माहितीसह विविध शासकीय योजनांची मागील साडेतीन वर्षातील योजनांची माहिती छायाचित्रासह देण्यात आली आहे.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145