Published On : Thu, Apr 12th, 2018

पनवेल ते इंदापूर टप्पा चौपदरीकरणाच्या कामांना गती देण्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

Advertisement

मुंबई: मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पनवेल ते इंदापूर टप्प्याचे चौपदरीकरण आणि कोल्हापूर येथील बाह्य वळणाच्या आराखड्यास मंजुरी संदर्भातील कामे जलदगतीने करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज संबंधिताना दिले.

पनवेल ते इंदापूर टप्प्याच्या चौपदरीकरण कामाबाबत आणि कोल्हापूर येथील बाह्यवळण रस्त्याच्या आखणीसंदर्भात आढावा बैठक मंत्रालयात श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी श्री. पाटील यांनी कामांचा आढावा घेतला आणि संबंधित अधिकाऱ्यांना पुढील कामांसंदर्भात निर्देश दिले. या बैठकीस उपजिल्हाधिकारी ए. आर. हडगल, सचिव के. टी. पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे तांत्रिक सदस्य श्री. तावडे, प्रादेशिक अधिकारी राजू सिंग, प्रकल्प संचालक प्रशांत हेगडे आदीसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

कोल्हापूर येथील बाह्यवळण मार्गाच्या आराखड्यात स्थानिकांच्या मागणीनुसार बदल करण्यात आल्याने, या मार्गात जाणारी स्थानिकांची घरे आता सुरक्ष‍ित राहणार आहेत. याचबरोबर स्थानिकांच्या मागणीनुसार शेतामधून रस्ता न नेता वळण घेण्यात आले आहे. या संदर्भातील बदलाची माहिती संबंधित स्थानिक प्रतिनिधींना द्यावी आणि पुढील कार्यवाही करावी, अशा सूचना श्री. पाटील यांनी यावेळी दिल्या.

पनवेल ते इंदापूर मार्गाच्या चौपदरीकरणासंदर्भात श्री. पाटील म्हणाले, हा एकूण ८४ कि.मी. चा रस्ता असून, पनवेल ते काराव या 38 किमी चे काम बीओटी तत्वावर सुरू आहे. कारावपासून पुढील १६ कि.मी. रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्यापुढील ३० कि.मी. च्या कामाच्या निविदेसंदर्भातला प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे विचाराधीन असून त्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश श्री. पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.