Published On : Thu, Dec 16th, 2021
By Nagpur Today Nagpur News

ओमीक्रॉनबाबत जनजागृती मोहिमेला सुरुवात.

जिल्हाधिकाऱ्यांनी केले उदघाट्न अफवा टाळण्याचे आवाहन.

सिव्हिल लाईन जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या हॅन्डबिलचे लोकार्पण करताना जिल्हाधिकारी आर. विमला, पोलिस उपायुक्त बसवराज तेली, सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक अजित पारसे.

नागपूर: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सोशल मिडियावर मोठ्या अफवा पसरल्या. ओमीक्रॉनबाबत त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी जनजागृती राबविण्यात येत आहे. सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक अजित पारसे यांनी तयार केलेल्या स्टिकर, भित्तीपत्रकाचे लोकार्पण करीत जिल्हाधिकारी आर. विमला यांनी मोहिमेचे उदघाट्न केले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात सोशल मिडियावर अफवा, अर्धवट माहितीची पेरणी झाली. अफवांमधून नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमातून अनेकांना योग्य उपचार मिळू शकले नाही. यातही काही बळ गेले. प्रशासनाची पूर्ण ताकद त्यावेळी कोरोनाविरुद्ध लढण्यात होती. या अफवांवर नियंत्रण ठेवणे कठीण गेले, आता ओमीक्रॉनने शहरात शिरकाव केला. पुढे याबाबतही अशाच अफवांची शक्यता आहे. त्यामुळे सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक अजित पारसे यांनी ‘नो अफवा @ ओमीक्रॉन कॅम्पेन’ ही मोहिम सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी आर. विमला यांना पत्र लिहिले.

जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या मोहिमला हिरवी झेंडी दाखवली. ओमीक्रॉनबाबत पारसे यांंनी तयार केलेल्या स्टिकर, हॅन्डबिलचे जिल्हाधिकारी आर. विमला यांनी बुधवारी लोकार्पण केले. यावेळी पोलिस उपायुक्त बसवराज तेली उपस्थित होते. ही मोहिम सोशल मिडियावर व्हीडीओ, पोस्ट, शिबिरे, पथनाट्यातून राबविण्यात येणार आहे. ओमीक्रॉनबाबत अर्धवट माहिती रोखणे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे पारसे यांनी सांगितले. याशिवाय ही मोहिम वेब नागपूर या संकेतस्थळावरूनही सुरू राहणार आहे. या संकेतस्थळावर निःशुल्क नोंदणी करून मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन पारसे यांनी केले आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वेगवेगळ्या अफवा उडाल्या होत्या. अनेकांपर्यंत उपचार आदीबाबत योग्य माहिती पोहोचली नाही. तशीच परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, या उद्देशाने जनजागृती मोहिम सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या मोहिमेला हिरवी झेंडी दाखवली. नागरिकांंनी ओमीक्रॉनबाबत कुठलीही माहिती, पोस्ट शेअर करताना विचार करावा.

– अजित पारसे, सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक.
www.webnagpur.com

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.