Published On : Thu, May 14th, 2020

खरीप हंगामात शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करा – सुनील केदार

पाझर तलाव व कालव्याच्या कामाची केली पाहणी

नागपूर : मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. कमी पावसामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकाला योग्य न्याय देता येत नाही. कमी पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यातच भूजल पातळी कमी असल्यामुळे विहिरीला सुद्धा पाणी लागत नाही आहे. या करिता शासनाने पाझर तलावाची निर्मिती केली. सावनेर कळमेश्वर मतदार संघातील झिल्पी, तिष्टी 1 व तिष्टी 2 या पाझर तलावाची पाहणी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी केली.

श्री. केदार यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून पाझर तलावाच्या नूतनीकरणा विषयी संपूर्ण कामाची माहिती घेतली. पाझर तलावाच्या गळती विषयी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. गळती रोखण्याकरिता व पाण्याचा अपव्यय टाळण्याकरिता तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्याचप्रमाणे पाण्याच्या निचरा योग्य प्रमाणात होण्याकरिता व त्या पाण्याच्या उपयोग शेतकऱ्यांना झाला पाहिजे याची दक्षता घ्यावी असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

यानंतर पिल्कापार, खैरी, रामपुरी, नागलवाड़ी, महारकुंड येथील कालव्याच्या कामाची पाहणी केली. या कामावर समाधान व्यक्त करत या कालव्यातील पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे असे निर्देश दिले. या वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, मुख्य अभियंता गवळी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषदेचे अधिकारी, जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.