Published On : Fri, Nov 12th, 2021

नागपूर शहरातील क्रीडांगणाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्या

महापौर दयाशंकर तिवारी यांचे केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांना निवेदन

नागपूर : नागपूर शहरातील खेळाडूंना उत्तम क्रीडांगणे उपलब्ध व्हावीत, त्यांना क्रीडा साहित्य मिळावेत याकरिता क्रीडांगणाच्या विकासासाठी केंद्र सरकारद्वारे जिल्हास्तरीय खेलो इंडिया योजने अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात यावे. तसेच शहरात भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत खेलो इंडिया केंद्र नागपूरात सुरु करावे, अशा मागणीचे निवेदन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुरागसिंग ठाकुर यांना दिल्लीमध्ये दिले आहे. सोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा प्रतिलिपी पाठविली आहे. क्रीडा मंत्री श्री. ठाकुर यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला.

निवेदनात म्हटले आहे की, देशात नागपूर क्रीडा क्षेत्रात विकसनशील शहर आहे. नागपुरने देशाला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू दिले आहेत तसेच अनेक राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन या शहरात करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिका दरवर्षी ‘खेलो नागपूर खेलो’ खासदार क्रीडा महोत्सव आयोजित करीत असते. यात शहरातील विविध खेळातील खेळाडू भाग घेतात. नागपूर शहरात कबड्डी, बास्केटबाँल, खो-खो, बॉक्सिंग, ऍथलेटिक, स्विमिंग, व्हॉलीबॉल, सॉफ्टबॉल, फेन्सिंग, शूटिंग, आर्चरी, वेटलिफ्टिंग, पॅरालिम्पिक, टेबल टेनिस आदी क्रीडा प्रकारातील लोकप्रिय आणि प्रतिभावान खेळाडू आहेत. त्यामुळे या खेळाडूंना आधुनिक क्रीडा साहित्य, प्रशिक्षण आणि योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी नागपूरमध्ये खेलो इंडिया केंद्र सुरु करण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती महापौर दयाशंकर तिवारी यांनी निवेदनातून केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांना केली आहे.