नागपूर – गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने धंतोलीतील हॉटेल मिडासमध्ये छापा घालून सेक्स रॅकेटचा छडा लावला. येथे तीन वारांगना तसेच त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेणारा आरोपी कुणाल ऊर्फ देवेंद्र हरिशंकर पटले (वय २८, रा. सुहागपूर हाैशंगाबाद, मध्य प्रदेश) याला ताब्यात घेतले.
आरोपी कुणालचे साथीदार रेहान आणि राज फरार आहेत. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाला रेहान, राज आणि कुणाल ऑनलाईन सेक्स रॅकेट चालवून विविध हॉटेलमध्ये वेश्या पुरवितात, अशी माहिती मिळाली.
त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींसोबत पंटरच्या माध्यमातून संपर्क साधला. शुक्रवारी सायंकाळी आरोपींनी तीन वारांगना मिडास हॉटेल ॲंड रेस्टॉरंटमध्ये उपलब्ध करून देताच पोलिसांनी त्या ठिकाणी छापा घातला. यावेळी वेश्या व्यवसाय करणाऱ्या कोलकाताच्या तरुणीसह तिघींना ताब्यात घेण्यात आले, तर कुणालला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध धंतोली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
