Published On : Tue, Oct 23rd, 2018

नागपुरात सूरतमधील वारांगना ताब्यात

Advertisement

नागपूर : वर्दळीच्या ठिकाणी ग्राहकांना बोलावून त्याच्या हवाली देहविक्रय करणारी महिला-तरुणी उपलब्ध करणाऱ्या एका दलालाला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याने वेश्याव्यवसाय करण्यासाठी सूरत(गुजरात)मधून आणलेल्या एका वारांगनेला पोलिसांनी ताब्यात घेतले. शंकर ऊर्फ सुधीर रामपद घोष (वय ५२) असे अटक करण्यात आलेल्या दलालाचे नाव असून, तो मूळचा पश्चिम बंगालमधील बाबुळगाव, नंदिया येथील रहिवासी आहे. तो सध्या शंकरनगरातील इंद्रउमा अपार्टमेंटमध्ये राहतो.

घोष इंटरनेटच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय करीत होता. त्याच्याकडे नागपूरसह विविध राज्यातील वारांगना उपलब्ध असून, तो त्यांना विशिष्ट अवधीसाठी विशिष्ट रक्कम देऊन बोलावून घेत होता. स्वत:च्या फ्लॅटवर ठेवल्यानंतर संपर्क करताच ग्राहकाला तो वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध करून देत होता.

त्याच्या ‘आॅनलाईन गोरखधंद्या’ची माहिती कळताच गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली एसएसबीच्या पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे सोमवारी दुपारी घोषसोबत पोलिसांच्या बनावट ग्राहकाने संपर्क साधला. त्याने देहविक्रय करणारी वारांगना फुटाळा चौपाटीवर उपलब्ध करून देतो, विशिष्ट वेळेनंतर तिला तेथे सोडून दे, असे म्हणत ग्राहकाला बोलाविले. त्यानुसार, ग्राहक फुटाळा चौपाटीवर पोहोचला. तेथे घोषने त्याला एक तरुणी दिली. घोष तेथून सटकण्याच्या तयारीत असतानाच एसएसबीच्या पथकाने त्याच्या मुसक्या बांधल्या. त्याच्याविरुद्ध अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

१८ दिवसात १६ वी कारवाई
प्रसारमाध्यमांनी टीकेची झोड उठविल्याने गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकात फेरबदल करण्यात आले. उपायुक्त कदम यांनी एसएसबी आपल्या अधिकारात येताच कुंटणखाने चालविणाºयांना पकडण्याचा धडाका लावला आहे. वर्षभरात घडल्या नाही तेवढ्या कारवाया एका महिन्यात अर्थात १८ दिवसात १६ कारवाया केल्या आहेत. त्यामुळे कुंटणखाना चालविणाऱ्यांनी आता आपली पद्धत बदलविली आहे.

कुणाच्या घरात अथवा फ्लॅटमध्ये कुंटणखाना चालविण्याऐवजी दलाल थेट ग्राहकांना वर्दळीच्या ठिकाणी बोलावतात. तेथे रक्कम घेतल्यानंतर त्याच्या हवाली वेश्याव्यवसाय करणारी तरुणी किंवा महिला उपलब्ध केली जाते. घोषने असाच गोरखधंदा चालविला होता. सूरतच्या तरुणीच्या बदल्यात त्याने १० हजार रुपये घेतले होते.