Published On : Sun, Apr 2nd, 2017

रेडीरेकनरच्या दरात वाढ झाल्याने घरांच्या किंमतीही वाढणार

Advertisement

मुंबई- नोटाबंदीमुळे सर्वच क्षेत्रात आलेली आर्थिक मंदी दूर करण्यासाठी रेडी रेकनरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मात्र, आत्तापर्यंतची ही सर्वात कमी वाढ असल्याचा राज्य सरकारचा दावा आहे. राज्य सरकारकडून रेडी रेकनरच्या दरात सरासरी ५.८६ टक्क्यांची वाढ केली आहे.

रेडी रेकनरच्या दरात भरघोस वाढ टाळली असून, यंदा ५.८६ टक्के इतकी आतापर्यंतची सर्वात कमी दरवाढ केली आहे. यावर्षीच्या सुधारित रेडी रेकनरच्या दरांनुसार, ग्रामीण क्षेत्रात ७.१३ टक्के वाढ करण्यात आली आहे. तर प्रभाव क्षेत्रात ६.१२ टक्क्यांची दरवाढ करण्यात आली आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रात ५.५६ टक्के, महापालिका क्षेत्रात ४.७४ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी व्यवहारांतील दरांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही.

राज्य सरकारने घोषित केलेल्या रेडी रेकनरच्या दरामध्ये सर्वाधिक दरवाढ अहमदनगर महापालिकेसाठी आहे. अहमदनगरमध्ये रेडी रेकनरच्या दरांमध्ये ९.८२ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. तर नागपूरसाठी सर्वात कमी म्हणजे १.५० टक्के वाढ करण्यात आली आहे. याशिवाय मुंबईत ३.९५, ठाणे ३.१८, पुणे ३.६४, नाशिक ९.३५ टक्के वाढ करण्यात आली आहे.

रेडी रेकनर म्हणजे काय?

जमिनीच्या खरेदी विक्रीसाठी व्यवहाराच्या नोंदणीसाठी राज्य सरकारकडून मुद्रांक शुल्क आकारलं जातं. त्यासाठी जमीन आणि इमारतीचे विभागनिहाय वार्षिक बाजारमूल्य ठरवले जाते. त्यालाच रेडी रेकनर म्हणले जाते. यामध्ये बांधकामाचा प्रकार, स्थळ आदींसंबंधी मालमत्तेचे गुण देषावरुन रेडी-रेकनरचे दर कमी आधिक ठरवले जातात.

रेडी रेकनरचे दर कायम राहणार

राज्य सरकारने रेडी रेकनरच्या दरात सरासरी ५.८६ टक्के वाढ केली असून, ग्रामीण भागासाठी ७.१३ टक्के, तर नगरपालिका क्षेत्रासाठी ५.५६ टक्के, महानगरपालिका क्षेत्रासाठी ४.४७ टक्के वाढ केली आहे. तसेच ज्या ठिकाणी व्यवहारातील दरात वाढ नाही, तिथे रेडी रेकनरचे दर कायम राहणार असल्याचंही राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे.

घर खरेदीचे स्वप्न महागणार

राज्य सरकारने गेल्या वर्षी २०१६-१७ मध्ये सरासरी ७ ते ८ टक्क्यांची वाढ केली होती. त्यामुळे सध्याची ही दरवाढ कमी असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे. दरम्यान, रेडी रेकनरच्या दरवाढीमुळं सर्व सामान्यांचं घर खरेदीचं स्वप्नंही महाग होणार आहे