Published On : Sat, Feb 1st, 2020

गांधी विचारांवरील निबंध लेखन स्पर्धेचे रविवारी २ फेब्रुवारी ला बक्षीस वितरण

Advertisement

नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वयम् सामाजिक संस्था, माय करिअर क्लब आणि जागतिक अहिंसा दिन आयोजन समितीच्या वतीने इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ‘सामाजिक एकतेसाठी गांधी विचारांची गरज’ या विषयावर घेण्यात आलेल्या या निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा रविवारी (ता. २ फेब्रुवारी) सायंकाळी ६ वाजता सीताबर्डी येथील विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक संकुलात आयोजित करण्यात आला आहे. माजी केंद्रीय मंत्री विलासराव मुत्तेमवार अध्यक्षस्थानी असतील, तर आमदार विकास ठाकरे प्रामुख्याने उपस्थित राहतील. या वेळी प्रा. संदीप तुंडुरवार हे गांधी विचारांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.

महात्मा गांधी यांनी आपल्या आचरणातून मानवी समाजाला समता आणि बंधुत्वाचा संदेश दिला. सर्वधर्मसमभाव मानून स्वातंत्र्यलढा उभारला. देशहितासाठी सामाजिक ऐक्य महत्त्वाचे असल्याचे त्यांनी वेळोवेळी सांगितले. सर्वधर्मीयांना एकत्र करून त्यांनी उज्ज्वल भारताचे स्वप्न पाहिले. म्हणूनच आजही त्यांचे विचार कालसुसंगत वाटतात. त्यांनी समाजाला सत्य आणि अहिंसेचे महत्त्व पटवून दिले. बदलत्या काळातही गांधी विचार भावी पिढीला मार्गदर्शक ठरतात.

गांधी विचार आणि तत्त्वांचे महत्त्व नव्या पिढीला कळावे, इतिहासाच्या अभ्यासातून अनुभवसंपन्न पिढी घडावी, विद्यार्थ्यांमध्ये विचारक्षमतेसह लेखनकौशल्य विकसित व्हावे, या हेतूने ही निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत शहरातील ४० शाळा-महाविद्यालयांतील सातशेवर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. सहभागी शाळा/महाविद्यालयांतील सर्वोत्कृष्ट निबंध लिहिणाऱ्या एका विजेत्याला गौरविण्यात येईल, तर प्रत्येक शाळेतील क्रमवार ३ विजेत्यांना सेवाग्राम आश्रमाला भेट देण्याची संधी मिळणार आहे. तसेच सर्व स्पर्धकांना प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात येईल. निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्वयम् सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ७७२००५०२४५ किंवा ९८२३४१८४५७ या क्रमांकावर संपर्क साधावा.